Hinjawadi Crime News : चार जणांची टोळी प्रवाशांना द्यायची कोरोना निगेटीव्ह असल्याचे बनावट प्रमाणपत्र

एमपीसी न्यूज – चार जणांची टोळी प्रवास करणाऱ्या नागरिकांना कोरोना निगेटिव्ह असल्याचे बनावट प्रमाणपत्र द्यायची. या टोळीवर हिंजवडी पोलिसांनी कारवाई करत गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 19) दुपारी इंदिरा कॉलेज जवळ वाकड येथे उघडकीस आला.

पत्ताराम केसारामजी देवासी (वय 33, रा. भुमकर वस्ती, वाकड), राकेशकुमार बस्तीराम वैष्णव (वय 25, रा. धनकवडी, पुणे), चिरंजीव (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही), राजू भाटी (रा. वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल कुणाल शिंदे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील इंदिरा कॉलेज जवळ असणाऱ्या शनी मंदिरात कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र प्रवास करणाऱ्या नागरिकांना एक टोळी पुरवत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत चार जणांवर कारवाई केली.

त्यातील आरोपी राकेशकुमार वैष्णव हा बनावट कोरोना रिपोर्ट बनवून व्हाट्स अपवर पाठवत होता. हे रिपोर्ट वाकड येथून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना प्रवाशांच्या मागणीनुसार दिले जात होते. रिपोर्टवर लाइफनीटी वेलनेस इंटरनॅशनल लिमिटेड बावधान या लॅबचे बनावट लेटरहेड आणि डॉक्टरांचे बनावट सह्या व शिक्के आरोपी नमूद करत असत. हिंजवडी पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.