Hinjawadi Crime News : विक्री करण्यासाठी आणलेला पाच लाखांचा गुटखा जप्त; चार जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – गुटखा विक्रीसाठी दुचाकीवरुन जात असलेल्या एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करत पोलिसांनी पाच लाख 13 हजारांचा गुटखा जप्त केला. तसेच चार जणांवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई शनिवारी (दि. 23) सायंकाळी पाचच्या सुमारास म्हाळुंगे येथे हिंजवडी पोलिसांनी केली.

रामकिशोर भवरूराम चौधरी (वय 34), महेंद्र भवरूराम चौधरी (वय 25, दोघे रा. विशालनगर, पिंपळे निलख), दीपाराम उर्फ दिपाजी राठोड, जितू भाटी (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रवी प्रकाश पवार यांनी फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या सूचनेनुसार अवैध धंद्यांची माहिती काढण्यासाठी पोलिसांचे एक पथक हिंजवडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलिसांना रामकिशोर चौधरी हा दुचाकीमध्ये गुटख्याची वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत रामकिशोर आणि त्याचा भाऊ महेंद्र हे दोघेजण गुटखा विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची त्याने कबुली दिली. तसेच, आरोपी राठोड आणि भाटी हे गुटख्याचा माल पुरवीत असून म्हाळुंगे येथे एका गोडावूनमध्ये माल ठेवल्याचे रामकिशोर याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून पाच लाख 13 हजार 226 रुपयांचा गुटखा आणि एक 50 हजार रूपये किमतीची दुचाकी जप्त केली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहायक आयुक्त गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, सहायक निरीक्षक सागर काटे, पोलीस कर्मचारी पराळे, रवी पवार, पांढरे, अली शेख यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.