Hinjawadi Crime News : ‘हातभट्टीची दारू घरामागच्या अंगणात पुरायची, नंतर जमेल तशी विक्री करायची’

सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने हिंजवडी परिसरात एका दारुभट्टीवर छापा मारला. त्यात साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणात एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिला हातभट्टीची दारू तयार करून कॅनमध्ये भरून घरामागच्या अंगणात पुरायची. कालांतराने त्या दारूची वाहतूक करून आसपासच्या परिसरात विक्री करायची.

नेरे -दत्तवाडी रोडलगत असलेल्या शिवाजी नगर, हिंजवडी येथे एक महिला राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मोकळ्या मैदानात तयार केलेली गावठी हातभट्टीची दारु प्लास्टीक कॅन्समध्ये साठवून ते कॅन जमिनीमध्ये पुरत होती. त्यानंतर तिला शक्य त्या वेळी ती त्या दारूची वाहतूक करुन त्याची विक्री करत होती.

याबाबत सामाजिक सुरक्षा पथकाला शुक्रवारी (दि. 4) माहिती मिळाली. पोलिसांनी दुपारी सव्वाएक वाजताच्या सुमारास तिथे छापा मारून कारवाई केली.

या कारवाईमध्ये दोन लाख 80 हजारांची टाकी, त्यात साडेतीन हजार गावठी दारू बनविण्याचे रसायन, एक हजारांची लोखंडी टाकी, 500 रुपयांची मोकळी टाकी, 200 रुपयांचा एक पाईप असा एकूण तीन लाख 52 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.