Hinjawadi Crime News : दुचाकीवर फिरून मटक्याचे आकडे गोळा करणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांकडून अटक

मटका जुगार घेण्याची पद्धत बदलली

एमपीसी न्यूज – पोलिसांच्या सततच्या धाड सत्रामुळे जुगार अड्डे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. असे असले तरी जुगार अड्डे अजूनही सुरूच आहेत. एखाद्या पत्र्याच्या शेडमध्ये चालणार जुगार अड्डा आता दुचाकीवर चालू लागला आहे. अशा प्रकारे दुचाकीवर फिरून मटका जुगार घेणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

तन्वीर कमरुद्दीन खाटीक (वय 42, रा. येळवंडे वस्ती, हिंजवडी), जय बालाजी गोसावी (वय 23, रा. चिंतामणी नगर, हांडेवाडी, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांचा जुगार अड्डा मालक आविश खान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापा सत्र सुरु आहे. त्यामुळे एखाद्या पत्र्याच्या शेडमध्ये चालणारे जुगार अड्डे आता वेगळ्या प्रकारे सुरु झाले आहेत. ऑनलाईन माध्यमातून तसेच फिरून मटका जुगाराचे आकडे गोळा करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. यावर देखील पोलीस नजर ठेऊन आहेत. शनिवारी हिंजवडी परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक कुणाल शिंदे यांना माहिती मिळाली कि, नेरे दत्तवाडी रोड येथील एका हॉटेलच्या पार्किंगच्या मोकळ्या जागेत दुचाकीवर थांबून दोघेजण मटका जुगाराचे आकडे घेत आहेत.

त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावून तन्वीर आणि जय या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, एक दुचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण 65 हजार 60 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तन्वीर आणि जय हे दोघेजण अविश खान याच्यासाठी काम करत असल्याची कबुली त्या दोघांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.