Hinjawadi Crime News : हिंजवडी पोलिसांची पाच अवैध धंद्यांवर कारवाई

एमपीसी न्यूज – हिंजवडी परिसरात सुरु असलेल्या तीन दारूभट्ट्या आणि दोन दारू विक्री करणा-या ठिकाणी हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली. त्यात साडेसहा लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. या कारवाया सोमवारी (दि. 8) सरपंच पदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्या आहेत.

पहिली कारवाई पारखे वस्ती, माण येथे करण्यात आली. रेकॉर्डवरील गुन्हेगार बाबू कुब्या राठोड आणि त्याच्या दोन साथीदारांनी गावठी दारूची भट्टी सुरु केली होती. त्यावर कारवाई करून पोलिसांनी एक लाख 95 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई पारखे वस्ती, माण येथे मोकळ्या जागेत करण्यात आली. दोन अज्ञात इसमांनी दारूभट्टीसाठी लागणारे साहित्य जमा करून भट्टी सुरु केली होती. त्यावर कारवाई करून रसायन आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख 73 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. यात दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसरी कारवाई साखरे वस्ती येथे करण्यात आली. गणेश पांडुरंग थोरात (वय 38, रा. थेरगाव) हा बेकायदेशीरपणे गावठी, देशी, विदेशी दारू विक्री करत होता. त्याच्यावर कारवाई करून पोलिसांनी 75 हजार 930 रुपयांचा दारूसाठा जप्त केला. पोलिसांनी दारू विक्रेता गणेश थोरात यांच्यासह जागा मालक जांभुळकर (पूर्ण नाव माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चौथी कारवाई नेरे येथे करण्यात आली. अविनाश बर्मा मारवाडी (वय 35), ज्योती अविनाश मारवाडी (वय 30), पायल येसु मारवाडी (वय 26, तिघे रा. नेरेगाव रोड, नेरे, ता. मुळशी) यांच्या विरोधात दारू भट्टी लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 70 लिटर दारू, तीन हजार लिटर दारू बनविण्याचे रसायन असा एकूण दोन लाख पाच हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पाचवी कारवाई बावधन येथे मारुती मंदिराजवळ करण्यात आली. शाम द्वारकानाथ शेळके (वय 35, रा. बावधन बुद्रुक, ता. मुळशी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याला बेकायदेशीरपणे दारू विक्री करताना पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून 300 रुपयांची पाच लिटर दारू हस्तगत करण्यात आली आहे.

पाचही कारवायांमध्ये पोलिसांनी सहा लाख 50 हजार 930 रुपयांचे दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि तयार दारू हस्तगत करून त्याची विल्हेवाट लावली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.