Hinjawadi Crime News : ट्रक, टेम्पो चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद; 80 लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंजवडी पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – हायवा ट्रक, आयशर, छोटा हत्ती चोरणा-या आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. हिंजवडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने सहा आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून 80 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक आरोपी चोरलेल्या गाडीचे जीपीएस काढून रस्त्याने जाणाऱ्या दुसऱ्या गाडीत टाकून पोलिसांची दिशाभूल करत होते.

गणेश अर्जुन पुरी (वय 28, रा. चाकुर, जि. लातूर ), प्रकाश नारायण गिरी (वय 31, रा. हासेगाववाडी, ता. औसा जि. लातूर), कुशल अभिमन्यु जाधव (वय 32, रा. मुळशी खुर्द, ता. मुळशी, जि.पुणे), जितेंद्र कृष्णकुमार यादव (वय 22, रा. सांगवी, पुणे ), मुजुब महम्मद शेख (वय 38, रा. लातूर) व जमशेद ऊर्फ फिरोज युनुस खान पठाण (वय 38, रा. गालीबनगर, उस्मानाबाद), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात वाढलेल्या वाहन चोरीला आळा घालण्याचे आदेश आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिले होते. त्यानुसार वाकड पोलिसांनी चोरीला गेलेल्या हायवा ट्रक (एमएच 14 जीडी 1500) याचा तपास सुरू केला. तपासादरम्यान सीसीटीव्ही फूटेज पहिले असता देहुरोड व पौड याठिकाणी अश्याच चोऱ्या झाल्याचे समजले. या सर्व चोऱ्यांमध्ये इनोव्हा गाडी वापरल्याचे दिसून आले. इनोव्हा गाडीचा नंबर मिळवून पोलिसांनी गाडी मालकाची माहिती काढली.

दरम्यान, वारजे व हिंजवडी परीसरात याच गाडीतून चोरटे चोरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पुणे -बंगळुरू हायवेवर सुस येथे सापळा रचून पहाटेच्या सुमारास संशयीत इनोव्हा गाडी व आरोपींना ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता आरोपींनी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, ठाणे, लातूर या ठिकाणावरुन वाहने चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपी हे चारचाकी वाहने चोरी करुन त्यातील जीपीएस सिस्टीम काढून रस्त्याने जाणाऱ्या दुसऱ्या गाडीत टाकून पोलिसांची दिशाभुल करत होते.

अटक आरोपींकडून आतापर्यंत सात चारचाकी व एक दुचाकी असा एकूण 80 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

त्यापैकी दाखल गुन्हयांतील एक हायवा ट्रक हा हैद्राबाद व एक आयशर टेम्पो हा तेलंगणा येथील जाहिराबाद येथे जाऊन पोलीस पथकाने ताब्यात घेतला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, सुधीर हिरेमठ, पोलीस उपआयुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त डिसले, अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सांवत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, पोलीस उपनिरीक्षक समाधान कदम, महेंद्र गाढवे, सहायाक पोलीस उप-निरिक्षक महेश वायबसे, बंडू मारणे, पोलीस अंमलदार बाळकृष्ण शिंदे, कुणाल शिंदे, अतिक शेख, रितेश कोळी, शिवराम भोपे, चंद्रकांत गडदे, इम्रान सय्यद श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, अमर राणे दत्ता शिंदे, झनकसिंग गुमलाडू , नुतन कोंडे, सुभाष गुरव यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.