Hinjawadi Crime News : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तिघांवर ‘पीएमआरडीए’कडून गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – शासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी सूस येथील दोन महिलांसह तिघांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नामदेव ऊर्फ नंदू बांधल आणि दोन महिला (रा. सूस, ता. मुळशी, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. विवेक प्रभाकर डुब्बेवार (वय 36, रा. नांदेड सिटी, पुणे) यांनी बुधवारी (दि. 23) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 20 मे ते 31 मे 2021 या कालावधीत सूस येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निमुर्लन विभागात कामाला आहेत. आरोपींनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केले. याबाबत डुब्बेवार यांनी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या तीनही आरोपींना नोटीस देऊन अधिकृत परवानगी घेतली असता कागदपत्रे सादर करण्यास सांगितले.

तसेच सदरचे बांधकाम अनधिकृत असल्यास 24 तासांत स्वखर्चाने पाडून टाकण्याचे आदेश दिले. मात्र आरोपींनी नोटीशीला उत्तर न देता अनधिकृत बांधकाम पाडलेही नाही.

यामुळे त्यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966चे कलम 52, 53, 54, 55, 56 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.