Hinjawadi crime News : डिलिव्हरी बॉयला पुलावरून फेकून देण्याची धमकी देत लुटले; एकजण पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – रिटर्न झालेली ऑर्डर परत घेऊन शेअर रिक्षातून जात असलेल्या एका डिलिव्हरी बॉयला रिक्षा चालक आणि शेअरिंग मधील ग्राहकांनी मिळून लुटले. तसेच आरडाओरडा केल्यास पुलावरून फेकून देण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. 4) दुपारी दीड वाजता भूमकर चौक, सर्व्हिस रोडवर घडली. हिंजवडी पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून एका आरोपीला पाच तासात ताब्यात घेतले.

मनीष कुमार भोगी पासवान (वय 22, रा. मांजरी हडपसर पुणे. मूळ रा. बिहार) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार परमेश्वर गंगाधर लोंढे (वय 23, रा.लातूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनीषकुमार हे डिलिव्हरी बॉय आहेत. हिंजवडी येथील एक ऑर्डर रिटर्न झाली होती. ती ऑर्डर परत घेऊन ते हिंजवडी मधील शिवाजी चौकातून बाणेर येथे शेअर रिक्षातून जात होते हिंजवडी ते बाणेर या प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत शेअरिंगमधील दोन सहप्रवासी आणि रिक्षा चालक यांनी मनीषकुमार यांना त्यांच्या इच्छित स्थळी न सोडता अज्ञात ठिकाणी नेले.

प्रवासात मनीषकुमार यांच्याकडील हेडफोन, पावरबँक, दीड हजार रुपये रोख रक्कम, चांदीची चेन, मोबाईल फोन असा एकूण 44 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरला. मनीषकुमार यांना मारहाण करून आरडाओरडा केल्यास ब्रिजवरून टाकून देण्याची धमकी दिली.

घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी सूत्रे हलवली. आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून रिक्षाची ओळख पटवली. त्यानंतर अवघ्या पाच तासात आरोपी परमेश्वर याला ताब्यात घेतले.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.