Hinjawadi Crime News : अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या दोन हॉटेलवर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा; सव्वा लाखाचा दारूसाठा जप्त

एमपीसी न्यूज – अवैधरित्या हॉटेलमध्ये दारू विक्री करणाऱ्या दोन हॉटेलवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. त्यात पोलिसांनी एक लाख 27 हजार 906 रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला.

ही कारवाई शुक्रवारी (दि. 18) रात्री सव्वानऊ वाजता हिंजवडी फेज तीन येथील स्वरा चायनीज अँड तंदूर पॉईंट आणि खुशबू कबाब करी अँड बिर्याणी रेस्टो येथे करण्यात आली.

योगेश राघू वाडेकर (वय 32), सुमित नागेश वाडेकर (वय 21), गणेश प्रभाकर गाणीग (वय 32) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये बेकायदेशीररीत्या देशी व विदेशी दारूच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या. हॉटेलमधील लोकांना एकत्र करून कोरोना साथीचा प्रादुर्भाव पसरविण्याचे कृत्य त्यांनी केले. तसेच दारू विक्रीचा कोणताही शासकीय परवाना नसताना त्यांनी दारू विक्री केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी दोन्ही हॉटेलमधून एक लाख 27 हजार 906 रुपये किमतीचा देशी, विदेशी दारू व बिअर बाटल्या असा दारूसाठा जप्त केला. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.