Hinjawadi Crime News : मेगापोलीस सोसायटीच्या संरक्षक भिंतीच्या कामावर तृतीयपंथीयांची दगडफेक; एकास अटक

एमपीसी न्यूज – माण येथे मेगापोलीस सोसायटीच्या संरक्षक भिंतीच्या कामावर तृतीयपंथीयांसह नऊ जणांनी मिळून दगडफेक केली. या प्रकरणात एका तृतीयपंथीला अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 29) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली.

साक्षी रश्मी दाभाडे (वय 33, रा. चांदोली, ता. खेड) असे अटक केलेल्या तृतीयपंथीचे नाव आहे. या आरोपीसह याबाबत रोहिदास सावंत, बायडाबाई सावंत, छाया रोहिदास सावंत (तिघे रा. माण, ता. मुळशी), सीमा गौरी दास, शिल्पा, पलक, संजना आणि एक तृतीयपंथी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनिल लक्ष्मण यादव (वय 58, रा. ताडीवाला रोड, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गवारवाडी माण येथे मेगापोलीस सोसायटीच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. हे काम करू नये यासाठी आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या कामगारांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर आरोपी पळून गेले. तृतीयपंथीयांनी फिर्यादी आणि कामगारांवर दगडफेक करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यास प्रतिबंध केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.