Hinjawadi Crime News : गुटखा विक्रीसाठी आलेले दोघे जेरबंद ; 30 लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज – हिंजवडी परिसरातून पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने गुटखा विक्रीसाठी आलेल्या एका टेम्पोवर कारवाई केली. त्यात पोलिसांनी रजनीगंधा, विमल यासह अन्य गुटखा, वाहने असा तब्बल 30 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या प्रकरणी परशुराम चौधरी मेघवाल, ललित गोविंदराम हरोल या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. प्रमुख आरोपी शाम चौधरी हा पळून गेला आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत माहिती दिली. हिंजवडी परिसरात गुटखा विक्रीसाठी काहीजण येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपासणी सुरू केली. त्या तपासणीमध्ये पोलिसांना एका टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गुटखा आढळला.

या कारवाईत पोलिसांनी परशुराम आणि ललित या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जितो पिकअप, इको व्हॅन, रजनीगंधा, विमल, आरएमडी गुटखा, तंबाखू असा एकूण 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

आरोपींसोबत या प्रकरणात आणखी किती लोकांचा सहभाग आहे, याबाबत माहिती काढली जात आहे. तसेच आरोपींकडून गुटखा विकत घेणाऱ्यांवर देखील कारवाई केली जाणार आहे.

… तर स्थानिक पोलिसांवर होणार कारवाई

सामाजिक सुरक्षा पथकाला अवैध धंद्यांची माहिती मिळते. त्यांच्याकडून कारवाई देखील केली जाते. मात्र, स्थानिक पोलिसांना याचा मागमूस देखील लागत नाही. याबाबत हिंजवडी पोलिसांना मेमो दिला जाणार आहे. तुम्हाला याबाबत का माहिती मिळाली नाही, याबाबत त्यांना विचारणा केली जाईल.

तसेच यापुढे जर हिंजवडी परिसरात गुटखा आढळून आला तर त्याची जबाबदारी स्थानिक पोलिसांची राहणार आहे, असेही आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.