Hinjawadi Crime News : दोन कारवायांमध्ये दोन लाख 36 हजारांचा दारूसाठा जप्त; हिंजवडी पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – हिंजवडी पोलिसांनी अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी एक आणि दारूभट्टी लावल्याप्रकरणी एक अशा दोन वेगवेगळ्या कारवाया करून दोन लाख 36 हजार 150 रुपयांचा दारूसाठा, दारू बनविण्यासाठी लागणारे कच्चे रसायन आणि अन्य साहित्य जप्त केले आहे.

पहिली कारवाई बावधन येथे करण्यात आली. हातभट्टीची तयार दारू विक्रीसाठी दोन कारमधून नेली जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी बावधन येथील हॉटेल सनडे मनडे समोर सापळा लावला. त्यात पोलिसांनी सँट्रो कार (एम एच 12 / ए एक्स 9290) आणि इंडिका कार (एम एच 12 / डी एस 7525) ताब्यात घेऊन त्यातून 525 लिटर हातभट्टीची तयार दारू जप्त केली. यात पोलिसांनी अशोक शाम जाधव (वय 27, रा. उत्तम नगर, बावधन) आणि सुभाष नारायण राठोड (वय 49, रा. उत्तम नगर, बावधन) यांच्या विरोधात कारवाई केली आहे.

दुसरी कारवाई नेरे दत्तवाडी रोडवरील कॅनॉलच्या बाजूला सुरु असलेल्या एका दारूभट्टीवर कारवाई केली. त्यात एका महिलेवर कारवाई करत पोलिसांनी 35 लिटरचे सहा कॅन, दोन हजार लिटर कच्चे रसायन, दोन पंप, एक चाटू असा एक लाख 29 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. दोन्ही कारवायांमध्ये एकूण 2 लाख 36 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, तपास पथक प्रमुख सागर काटे, महेश वायबसे, बंडू मारणे, कुणाल शिंदे, आतिक शेख, हनुमंत कुंभार, रवी पवार, दत्तात्रय शिंदे, आकाश पांढरे, सुभाष गुरव, चंद्रकांत गडदे, झनक गुमलाडू, श्रीकांत चव्हाण, अमर राणे, रितेश कोळी, कारभारी पालवे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.