Hinjawadi crime News : ‘गाडीची एन्ट्री न करता आत का गेला’, म्हणत सुरक्षा रक्षकाकडून एकाला मारहाण

एमपीसी न्यूज – ‘गाडीची एन्ट्री न करता आत का गेला’, असे म्हणत सोसायटीच्या गेटवरील सुरक्षा रक्षकाने एकाला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 14) दुपारी पावणे चार वाजता हिंजवडी येथील एक्झरबिया सोसायटीच्या मेन गेटवर घडली.

अतुल गुलाब लोंढे (वय 34, रा. काळाखडक, वाकड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नितीन दत्तात्रय दळवी (वय 32, रा. नेरे दत्तवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन हा हिंजवडी येथील एक्झरबिया सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहे. सोमवारी दुपारी फिर्यादी अतुल लोंढे त्यांच्या एक्झरबिया सोसायटीमध्ये राहणारा मित्र विकास सपकाळे यांना सोडायला सोसायटीमध्ये आले.

मित्राला सोडून अतुल परत निघाले. त्यावेळी सोसायटीच्या मेन गेटवर आरोपी नितीन याने अतुल यांना अडवले. ‘तू मेन गेटवर गाडीची एन्ट्री न करता आतमध्ये का गेला’ असे म्हणत नितीन याने अतुल यांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली.

यामध्ये अतुल यांच्या डोक्यात, हातावर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.