Hinjawadi Crime News : बनावट प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरीचा लाभ; सेपक टकरा असोसिएशनच्या सचिवासह बोगस खेळाडूंवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्तरावर सेपक टकरा हा खेळ खेळल्याचे बनावट प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरी प्राप्त केली. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य सेपक टकरा असोशिएशनच्या सचिवासह बोगस खेळाडू आणि अन्य पदाधिका-यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल या ठिकाणी घडली.

सुहास महादेव पाटील (वय 48) हे श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे नोकरीस असून त्यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 4) फिर्याद दिली आहे. महाराष्ट्र राज्य सेपक टकरा असोशिएशनचे सचिव डॉ. सुखदेव विश्‍वास, कुणाल आहिरे, इतर पदाधिकारी व बनावट प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरीचा लाभ घेणारे खेळाडू अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना 2009 ते 2018 या कालावधीत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुहास पाटील हे महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक संचनालयात सहायक संचालक आहेत. शासकीय परिपत्रकानुसार राष्ट्रीय स्तरावर विविध खेळ खेळणाऱ्या खेळाडूस पाच टक्‍के आरक्षण आहे. आरोपींनी आपसांत संगनमत करून महाराष्ट्र राज्य सेपक टकरा असोशिएशनच्या वतीने काही जणांना बनावट प्रमाणपत्र दिले.

या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरीतील पाच टक्‍के आरक्षणाचा लाभ घेतला. यामुळे जे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर खेळले आहेत त्यांच्यावर अन्याय झाला आहे. यामुळे आरोपी आणि बोगस खेळाडूंनी शासनाची फसवणूक केली असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.