Hinjawadi Crime : कत्तलीसाठी चालविलेल्या तीन जनावरांची सुटका; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – कत्तल करण्यासाठी चालविलेल्या दोन बैल व एका गायीची सुटका करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. 10) सकाळी बाणेर येथे घडली.

पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. टेम्पो चालक परवेश इस्माइल पठाण (वय 26, रा. गांधीनगर चौक, देहूरोड) आणि मोसीन सलीम मोमीन (वय 28, रा. कोंढवा, पुणे) अशी गुन्हा दाखल करून अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय 27, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी बुधवारी (दि. 11) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 10) सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी हे रस्त्याने जात असताना बाणेर येथे त्यांना एका टेम्पोला ताडपत्री लावली असल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत टेम्पो चालकास विचारले असता टेम्पोत म्हशी असल्याचे सांगितले. यामुळे फिर्यादी स्वामी यांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून पोलिसांना याबाबत कल्पना दिली.

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी टेम्पोची पाहणी केली असता त्यात दोन बैल व एक गायी असल्याचे दिसून आले. या जनावरांना क्रूरतेची वागणूक देऊन दाटीवाटीने टेम्पोत भरले होते. तसेच त्यापैकी एक जनावर जखमीही होते. ही जनावरे मुळशी तालुक्‍यातील नेरे येथून पुण्यातील कोंढवा येथे कत्तल करण्यासाठी नेत असल्याची कबुली आरोपींनी दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.