Hinjawadi Crime : गावठी दारू भट्टीवर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा; 16 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त

0

एमपीसी न्यूज – हिंजवडी परिसरात मुळा नदीच्या काठावर सुरु असलेल्या गावठी दारू भट्टीवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने शनिवारी (दि. 21) रात्री छापा मारला. त्यामध्ये पोलिसांनी दारू तयार करण्याचे रसायन, कार, दुचाकी, मोबाईल आणि अन्य साहित्य 16 लाख 75 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बाबू खुब्या राठोड (वय 40, रा. चांदेगाव, ता. मुळशी), राम तात्याराव क्षीरसागर (वय 33, रा. शिंदेवस्ती, मारुंजी, ता. मुळशी) यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, मुळशी तालुक्यातील माण येथे मुठा नदीच्या काठावर काही व्यक्ती अवैधरित्या गावठी दारू तयार करून त्याची विक्री करीत आहेत. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी रात्री साडेदहा वाजता दारू भट्टीवर छापा मारला.

दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच लाख रुपयांचे नऊ हजार लिटर दारू बनविण्याचे कच्चे रसायन, 70 हजार 500 रुपयांची एक हजार 175 लिटर तयार दारू, नऊ हजारांचे तीन हजार किलो सरपण, 10 लाखाची एक कार, पाच हजारांची थर्मल जाळी, एक हजाराचा मोबाईल फोन असा एकूण 16 लाख 75 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहाय्यक निरीक्षक अशोक डोंगरे, सहाय्यक फौजदार विजय कांबळे, पोलीस कर्मचारी सुनील शिरसाठ, भगवंता मुठे, नितीन लोंढे, अनिल महाजन, वैष्णवी गावडे, अमोल शिंदे, गणेश करोटे, मारुती करचुंडे, योगेश तिडके यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III