Hinjawadi Crime : एक दिवसाच्या तान्हुलीला फेकले कच-यात

एमपीसी न्यूज – मुलगी जन्माला आली म्हणून एक दिवसाच्या तान्ह्या बाळाला तिच्या पालकांनी जाणीवपूर्वक कच-यात फेकून दिले. त्यात त्या बाळाचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 26) रात्री आठ वाजताच्या सुमारास गवारे वाडीच्या डोंगरावर कचरा डेपोमध्ये उघडकीस आला आहे.

पोलीस शिपाई अमित जगताप यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात पालकांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस उपनिरीक्षक नंदराज गभाले यांनी याबाबत माहिती दिली आहे. हिंजवडी पोलिसांना शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास गवारे वाडीमधील एका स्थानिक व्यक्तीचा फोन आला. फोनवरील व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, गवारे वाडीच्या डोंगरावर कचरा डेपोमध्ये एका बाळाला फेकून देण्यात आले आहे.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अज्ञात पालकांनी स्त्री जातीचे पूर्ण वाढ झालेले एक दिवसाचे अर्भक जाणीवपूर्वक सोडून दिले आहे. बाळाला कापडात गुंडाळून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कच-यात फेकून दिले आहे. पोलिसांना ते बाळ मृतावस्थेत सापडले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.