Hinjawadi : वर्कशॉपमधील कार वापरण्यासाठी नेऊन कार परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी ग्राहकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – स्वतःच्या कारमध्ये बिघाड झाल्याने कार वर्कशॉपमध्ये रिपेअरिंगसाठी दिली. त्यानंतर वर्कशॉपमधील कार वापरण्यासाठी नेऊन दिलेल्या मुदतीत कार परत न देता फसवणूक केली. याप्रकरणी संबंधित ग्राहकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 30 जुलै 2019 ते 19 मार्च 2020 या कालावधीत बाणेर येथे घडला.

सदानंद भीमसेन येवले (रा. गंगापूर खुर्द, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या ग्राहकाचे नाव आहे. याप्रकरणी अश्रफ इब्राहिम शेख (वय 33, रा. पारखेवस्ती, पुणे) यांनी हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवले यांनी त्यांची टाटा हॅरियर ही कार (एमएच 14 / एक्यू 5019) फिर्यादी शेख यांच्या शोरूममधून घेतली. त्यानंतर मुंबई-बंगळुरू महामार्गावर गाडीमध्ये बिघाड झाला. त्यामुळे येवले यांनी त्यांची कार शेख यांच्या ताथवडे येथील वर्कशॉपवर नेली. येवले यांची कार रिपेअर होण्यासाठी काही वेळ लागत असल्याने शेख यांनी कंपनीच्या नावावर असलेली टाटा हेक्सा (एमएच 12 / पीएन 5033) ही कार येवले यांना दिली.

त्यानंतर कारबाबत विचारले असता ‘गाडी आणून देतो’ असे म्हणून कार न देता शेख यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.