Hinjawadi : फॉर्च्युनर घेण्यासाठी माहेरहून 40 लाख आणण्याची मागणी; विवाहितेची सासरच्यांविरोधात पोलिसात धाव

Demand for Rs 40 lakh for Fortuner ; The married woman ran to the police against her father-in-law

एमपीसी न्यूज – पतीच्या कारचा एका दुचाकीसोबत अपघात झाला. त्यावेळी संतप्त नागरिकांनी पतीची कार जाळून टाकली. याचा दोष विवाहितेला देत फॉर्च्युनर कार घेण्यासाठी माहेरहून 40 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केला. याबाबत विवाहितेने सासरच्यांविरोधात पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला.

शैलेंद्र प्रकाश पाडाळे, कल्पना प्रकाश पाडाळे, प्रकाश शंकर पाडाळे (सर्व रा. म्हाळुंगे, ता. मुळशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 25 वर्षीय विवाहितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 1 जानेवारी 2016 ते 10 जून 2020 या कालावधीत म्हाळुंगे येथे घडली आहे. विवाहिता सासरी नांदत असताना आरोपी पती शैलेंद्र याने दारू पिऊन शिवीगाळ करून वारंवार तिला मारहाण केली. विवाहितेला मुलगी झाली.

तसेच पती शैलेंद्र याच्या फॉर्च्युनर कारचा एका दुचाकीसोबत अपघात झाला. त्या अपघातात दुचाकीस्वाराचा अपघातस्थळी मृत्यू झाला. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी शैलेंद्रची फॉर्च्युनर कार जाळून टाकली.

या सर्व प्रकारासाठी विवाहिता जबाबदार असल्याचे म्हणत नवीन फॉर्च्युनर कार घेण्यासाठी माहेरहून 40 लाख रुपये घेऊन येण्याची मागणी सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे केली.

विवाहितेला त्यांच्या आई-वडिलांनी लग्नात दिलेले 26 तोळे सोन्याचे दागिने सासरच्या लोकांनी विवाहितेच्या परस्पर विकले. याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता पतीने विवाहितेला मारहाण केली.

विवाहितेला तिच्या मुलीसह घराच्या बाहेर काढून, वारंवार टोचून बोलून तसेच शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like