Hinjawadi : इंजेक्शन देताना डॉक्टरचा हलगर्जीपणा; जंतू प्रादुर्भावामुळे मुलीचा मृत्यू

डॉक्टर विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – थंडीताप आल्यामुळे रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी इंजेक्शन दिले. हे इंजेक्शन चुकीच्या पद्धतीने दिले. त्यामुळे जंतू प्रादुर्भाव झाला आणि त्यातच मुलीचा मृत्यू झाला. याबाबत सर्व वैद्यकीय अहवाल तपासून संबंधित डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रामकृष्ण क्लिनिक बावधन येथे घडली.

याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक ए एम पगारे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार डॉ. जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रज्ञा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 सप्टेंबर 2017 रोजी प्रज्ञा हिला थंडी ताप आल्यामुळे बावधन येथील रामकृष्ण क्लिनिकमध्ये आणले. तपासणी केल्यानंतर आरोपी डॉ. जाधव याने प्रज्ञाला उजव्या कमरेवर एक इंजेक्शन दिले आणि काही गोळ्या देऊन घरी सोडले. काही कालावधी नंतर प्रज्ञाला इंजेक्शन दिलेल्या जागी आणि उजव्या मांडीवर, कमरेवर आणि पाठीवर काळे चट्टे व फोड आले. त्यामुळे तिला तात्काळ उपचारासाठी पुणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर काही वेळेत तिची प्रकृती आणखी बिघडली आणि तिला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

आपल्या मुलीचा मृत्यू डॉ. जाधव याने चुकीच्या पद्ध्तीने इंजेक्शन दिल्याने झाला असल्याचे प्रज्ञाच्या वडिलांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांचा जबाब आणि डॉ. जाधव याने केलेल्या उपचारांची कागदपत्रे ससून रुग्णालयाच्या सक्षम अधिका-यांकडे सादर केली. वैद्यकीय अधिका-यांनी दिलेल्या अहवालानुसार, ‘इंजेक्शन दिल्याच्या जागी, कमरेवर, मांडीवर आणि पाठीवर काळे चट्टे व फोड येणे, ही इंजेक्शन चुकीच्या पद्धतीने दिल्याची लक्षणे आहेत. इंजेक्शन दिलेल्या जागेवरून झालेल्या जंतू प्रादुर्भावामुळे प्रज्ञाचा मृत्यू झाला आहे. यात डॉ. जाधव याने हलगर्जीपणा केला आहे.’ यावरून डॉक्टर विरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक एम डी वरुडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.