Hinjawadi Crime News : बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीनदार दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीनदार देणा-या टोळीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन प्रमुख आरोपींसह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 12 मे 2021 रोजी वाकड विभागाच्या सहायक पोलीस आयुक्‍त कार्यालयात घडली.

महेश हनुमानराम कालिराणा (वय 19, रा. मोरया पार्क लेन, पिंपळे गुरव), सलमान ताजुद्दिन मुजावर (वय 24, रा. जयभीमनगर, दापोडी) आणि त्याचे इतर साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक नाना बापू झेंडे यांनी सोमवारी (दि. 20) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून अंकुश सुदाम चौधरी (वय 25, रा. गजानन महाराज नगर, पिंपळे गुरव) हे बनावट नाव धारण केले. तसेच या नावाचा सातबारा, आधारकार्ड आणि रेशनिंगकार्ड तयार केले. ही कागदपत्रे बनावट असल्याचे माहिती असूनही आरोपींनी वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्‍त यांच्याकडे सादर केली.

दरम्यान, महेश कालिराणा याला जामिनदार राहून शासनाची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.