BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून लुटणा-या चौघांना अटक

खंडणी दरोडाविरोधी पथकाची कामगिरी; पाच गुन्ह्यांची उकल

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – प्रवासी कारमध्ये बसलेल्या प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 1 लाख 41 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई खंडणी दरोडाविरोधी पथकाने केली. यामुळे हिंजवडी, वाकड आणि वारजे पोलीस ठाण्यातील एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

मनोज एकनाथ गायकवाड (वय 24, रा. माटेगावरोड, उमापूर, ता. गेवराई, जि. बीड), नसीर मंजूर शेख (वय 25), सोमेश्वर तुकाराम म्हस्के (वय 22, दोघे रा. जुनी पेठ, ता. गेवराई, जि. बीड) आणि रघुनाथ गोविंद कळकेकर (वय 25, रा. धर्मापुरी, ता. कंदार, जि. नांदेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

  • वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 फेब्रुवारी 2019 रोजी मुकेश मोहिंदर कपूर (वय 46) हे हिंजवडीमधून रात्री साडेनऊच्या सुमारास प्रवासी कारमधून मुंबईला जात होते. कार वाकड ब्रिजपासून मुंबईच्या दिशेने काही अंतर गेली असता आणखी दोन आरोपी कारमध्ये बसले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून मुकेश यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल फोन, लॅपटॉप आणि एटीएम कार्ड जबरदस्तीने काढून घेतले. मुकेशला अज्ञात स्थळी सोडून दिले. याबाबत मुकेश मोहिंदर कपूर (वय 46) यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हिंजवडी पोलिसांसह या गुन्ह्याचा खंडणी दरोडा विरोधी पथकाने समांतर तपास केला.

आरोपींनी वापरलेल्या मोबाईल फोन आणि अन्य तांत्रिक मुद्द्यांचा तपास करत पोलिसांनी वरील चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. त्याचबरोबर त्यांनी यापूर्वी देखील अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याचे सांगितले. यावरून चौघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून एकूण 1 लाख 41 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामुळे हिंजवडी पोलीस ठाण्यातील तीन, वाकड आणि वारजे पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

  • ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी अजय भोसले, अशोक दुधवणे, राजेंद्र शिंदे, किरण काटकर, उमेश पुलगम, प्रवीण माने, सुधीर डोळस, प्रदीप गोडांबे, विक्रांत गायकवाड यांच्या पथकाने केली.
HB_POST_END_FTR-A4

.