Hinjawadi crime News : फ्लॅटच्या नावाखाली नऊ लाखांची फसवणूक; बांधकाम व्यावसायिकासह चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – प्रतिशिर्डी शिरगाव येथे मंदिराच्या बाजूला बांधकाम साईट सुरु असल्याचे सांगून तिथे फ्लॅट बुक करायला लावला. त्यासाठी दहा लाख रुपये घेतले. मात्र, बांधकाम साईटवरील काम बंद ठेऊन ग्राहकाला फ्लॅट न देता नऊ लाखांची फसवणूक केल्याबाबत एका बांधकाम व्यावसायिकासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

द प्रिस्टीन हॉरीझन प्रमोटर्स अँड बिल्डर्सचे मालक बांधकाम व्यावसायिक प्रतिक ओमप्रकाश अग्रवाल (रा. बाणेर, पाषाण रोड, पुणे), विनय बोरवेकर (रा. हिंजवडी), किरण कुंभारकर (रा. हिंजवडी), अजिंक्य (पूर्ण नाव माहिती नाही, रा. हिंजवडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी गणेश बाबू गिरीगोसावी (वय 33, रा. वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 29 जून 2020 पासून 7 ऑक्टोबर 2020 पर्यंतच्या कालावधीत द प्रिस्टीन हॉरीझन प्रमोटर्स अँड बिल्डर्सच्या हिंजवडी येथील ऑफिसमध्ये घडली आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांनी आपसात संगनमत करून प्रतिशिर्डी शिरगाव येथे मंदिराच्या बाजूला असलेल्या बांधकाम साईटची फिर्यादी यांना माहिती दिली.

फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून तिथे फ्लॅट बुक करायला सांगितले. त्यासाठी फिर्यादी यांच्याकडून दहा लाख रुपये घेतले. त्यानंतर बांधकाम साईटचे काम बंद ठेवले. त्यामुळे फिर्यादी त्यांच्या फ्लॅटचे बुकिंग रद्द करण्यास गेले असता त्यांना वेळोवेळी खोटी आश्वासने देऊन नऊ लाख रुपये न देता आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.