Hinjawadi : हिंजवडी ‘आयटी हब’मध्ये अलर्ट जारी

एमपीसी न्यूज – काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिंजवडी आयटी हबमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिंजवडीमध्ये असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना दहशतवादी संघटनांपासून धोका असण्याची शक्यता असल्याने केंद्रीय सुरक्षा बलाने हा  अलर्ट जारी करण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा येथे गुरुवारी (दि. 14) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट उसळली आहे. तब्बल 350 किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने भीषण आत्मघातकी हल्ला केला. या घटनेचे पडसाद संपूर्ण भारतभर उमटले आहेत. विविध स्तरातून या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

हिंजवडी आयटी हब हे देशातील महत्वाचे आयटी हब आहे. येथे अनेक विदेशी कंपन्या आहेत. यामुळे या परिसराला दहशतवादी संघटनांकडून धोका असल्याचे गुप्तचर यंत्रणांकडून यापूर्वीच कळविण्यात आले आहे. कंपन्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवानांच्या तुकड्या हिंजवडी परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत. दहशतवादी कारवायांची शक्यता लक्षात घेत जवनांना सतर्क राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

अलर्ट जारी केल्यानंतर केंद्रीय सुरक्षा बल आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणांच्या गस्तीमध्ये वाढ करण्यात आली आहे. कंपन्यांच्या प्रवेशद्वारापासून प्रवेश करणा-या प्रत्येक व्यक्ती आणि वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.