Hinjawadi: पोलीस ठाण्यापुढे आत्महत्येचा ‘तो’ प्रयत्न प्रेम प्रकरणातून!

एमपीसी न्यूज – आपल्या प्रेयसीने इतर कोणाशीही बोलायचे नाही. असा एकाधिकार दाखवणा-या प्रियकराला कंटाळून प्रेयसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली. पण तिला तक्रार न देता माघारी चल म्हणत वैतागलेल्या प्रियकराने चक्क पोलीस ठाण्यासमोरच हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि. 14) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास हिंजवडी पोलीस ठाण्यासमोर घडली.

याप्रकरणी 27 वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 28 वर्षीय प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी मागील 12 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. पूर्वी ते शिक्षण घेण्यासाठी एकत्र होते. तरुणी यवतमाळ येथील आहे. तर आरोपी तरुण अमरावती येथील आहे. एकत्र शिकत असताना दोघांची चांगली ओळख होती. काही वर्ष एकत्र शिक्षण घेतल्यानंतर त्यांची ताटातूट झाली.

मागील सहा वर्षांपासून तरुण पुण्यात नोकरीनिमित्त आला आहे. पुण्यात तो नोकरी देखील करीत आहे. दरम्यान, मागील दोन वर्षांपूर्वी तरुणी देखील पुण्यात नोकरीनिमित्त आली. पुण्यात आल्यानंतर दोघांचा पुन्हा संपर्क झाला आणि पुन्हा मैत्रीमार्गे एकतर्फी प्रेमाकडे वाटचाल सुरु झाली. तरुणीने इतर कोणालाही बोललेलं तरुणाला रुचत नसे. त्यावरून तो तिच्याशी वाद घालत असे. तिने फक्त त्याच्याशीच बोलायला हवं, असा एकाधिकार तो तिच्यावर गाजवू लागला.

त्याच्या एकाधिकाराचा तिला त्रास होऊ लागला. त्यामुळे तिने गुरुवारी सायंकाळी हिंजवडी पोलीस ठाणे गाठले. सर्व प्रकार तरुणीने पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तरुणाला बोलावून घेतले. दोघांनाही समज दिली. तरुणाने बोलण्यासाठी वेळ मागितला आणि दोघेही पोलीस ठाण्याच्या बाहेर बोलत थांबले. तो तिला वारंवार आपल्यासोबत येण्याची बळजबरी करू लागला. त्यासाठी तरुणीने नकार दिला. स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करून घेण्याची धमकी देत वैतागलेल्या तरुणाने धारदार शस्त्राने पोलीस ठाण्यासमोरच हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ त्याला हिंजवडी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत तरुणावर आत्महत्या करण्याची धमकी देत आत्महत्येचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.