Hinjawadi : पोलीस असल्याची बतावणी करून कार पळविणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – ‘आम्ही पोलीस आहोत, तुझी कार चेक करायची आहे’ अशी बतावणी करून कार चालकाला गुंगीचे औषध पाजले. पौड येथे कार चालकाला खाली उतरवून कार आणि सोनसाखळी घेऊन पळून गेलेल्या चोरट्यांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून कार आणि सोनसाखळी असा एकूण 4 लाख 50 हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.

सागर सुनील शिरवाळे (वय 31, रा. नांदेड फाटा, पुणे), महेश उर्फ बबल्या तानाजी नलावडे (वय 25, रा. निगडे, ता. वेल्हे) अशी अटक केलेली आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 फेब्रुवारी 2019 रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास बावधन येथे कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर रस्त्याच्या बाजूला एकजण होंडासिटी कार बाजूला घेऊन फोनवर बोलत बसला होता. त्यावेळी आरोपींनी त्याच्याजवळ जाऊन कारची चावी जबरदस्तीने काढून घेतली. ‘मी पोलीस आहे. तुझी कार चेक करायची आहे’ असे म्हणून चालकाला खाली उतरवले. डिक्की तपासण्याच्या बहाण्याने मागच्या बाजूला नेऊन चालकाच्या डोक्यात जॅकेटची टोपी घालून कारच्या मागच्या सीटवर बसवले.

आरोपींनी कारचालकाला पौड येथील युनायटेड क्रेन कंपनी येथे सोडले. दरम्यान, रस्त्यात आरोपींनी चालकाला दारूसारखे पेय पाजले. पौड येथे चालकाला उतरवून आरोपींनी कार आणि सोनसाखळी घेऊन पळ काढला. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरीला गेलेल्या कारबाबत तपास करत असताना हिंजवडी पोलिसांना माहिती मिळाली की, हा गुन्हा आरोपी सागर आणि महेश यांनी त्यांच्या अन्य दोन साथीदारांच्या मदतीने केला आहे. त्यानुसार, पोलिसांनी सागर आणि महेश या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून चोरून नेलेली होंडा सिटी कार (बी आर 07 / आर 0280) व सोनसाखळी असा एकूण 4 लाख 50 हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख अनिरुद्ध गिझे, एम डी वरुडे, पोलीस कर्मचारी वायबसे, बाळू शिंदे, किरण पवार, नितीन पराळे, आतिक शेख, कुणाल शिंदे, विवेक गायकवाड, सुभाष गुरव, अमर राणे, झनकसिंग गुमलाडू, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, विकी कदम, अली शेख, रितेश कोळी, आकाश पांढरे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.