Hinjawadi : हॉटेल बंद करण्याची धमकी देत भरदिवसा हॉटेल चालकाचे अपहरण आणि लूट

एमपीसी न्यूज – हॉटेल चालवण्याचे बंद करण्याची धमकी देत चार जणांनी मिळून हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण केले. त्यांना मारहाण करून लुटले. तसेच हॉटेल बंद न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि. 30) दुपारी दोनच्या सुमारास बाणेर येथे घडली.

हुआराम रामाजी देवासी (वय 31, रा. बावधन खुर्द, मूळ रा. राजस्थान) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार समीर चांदेरे, गणेश इंगवले आणि त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवासी हे मुंबई बेंगलोर महामार्गावर बाणेर येथे आशापुरी नावाचे हॉटेल चालवतात. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास गणेश इंगवले व एक अनोळखी इसम त्यांच्या हॉटेल समोर आले. त्यांनी देवासी यांना बाहेर बोलावून घेतले. ‘हॉटेल तू चालवत आहेस का’ असे म्हणत आरोपींनी देवासी यांना कारमध्ये जबरदस्तीने बसवले. दोघांनी मिळून देवासी यांना कारमध्ये शिवीगाळ करत मारहाण केली.

आरोपींनी देवासी यांना वीरभद्र नगर बाणेर येथे एका मोकळ्या प्लॉटमध्ये नेले. तिथे समीर चांदेरे आणि आणखी एक अनोळखी साथीदार होते. ‘तू हॉटेल कुणाला विचारून चालवण्यास घेतले, तू हॉटेल ज्या जागेत चालवत आहेस ती जागा माझी आहे. दोन तासांच्या आत हॉटेल बंद कर, नाहीतर तुला मारून टाकीन’ अशी समीर चांदेरे याने देवासी यांना धमकी दिली. आरोपींनी देवासी यांच्या खिशातून हॉटेल व्यवसायाचे असलेले एक लाख रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि पुन्हा देवासी यांना मारहाण करू लागले. त्यावेळी देवासी यांनी आरोपींच्या तावडीतून आपली सुटका करून घेत थेट हिंजवडी पोलीस ठाणे गाठले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.