Hinjawadi: हुंडा दिला नाही म्हणून पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लग्नात हुंडा दिला नाही म्हणून पत्नीस मारहाण करीत तिचा छळ केला. तसेच तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना हिंजवडी येथे घडली.

अश्‍विनी अक्षय लोंढे असे मृत्यूमुखी पडलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय काशिनाथ लोंढे (वय 24, रा. शिंदेवस्ती, मारूंजी रोड, हिंजवडी) असे गुन्हा दाखल केला आहे.

जयसिंग रमेश रिटे (वय 30, रा. ओल्याची राजुरी, ता. जामखेड, जि. अहमदनगर) यांनी रविवारी (दि. 6) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रिटे यांची बहिण अश्‍विनी हिचा विवाह आरोपी अक्षय याच्याशी दोन वर्षापूर्वी झाला. लग्नात हुंडा दिला नाही, या कारणावरून आरोपी अक्षय याने वेळोवेळी अश्‍विनी यांचा छळ करीत मारहाण केली.

अश्‍विनी यांना केलेल्या मारहाणीत 29 सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान रुग्णालयात अश्‍विनी यांचा मृत्यू झाला. मात्र, मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही. यामुळे शवविच्छेदनात अश्‍विनी यांचा व्हिसेरा तपासणीकरिता प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास उपनिरीक्षक हिंगोले करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.