Hinjawadi : हिंजवडीमधील रस्त्यांवर पाकिस्तानी झेंडा फडकावणारे सीसीटीव्हीत कैद; पोलीस पथके तरुणांच्या शोधात

एमपीसी न्यूज – हिंजवडीमधील रस्त्यांवर काही तरुण पाकिस्तानी झेंडा घेऊन दुचाकीवरून जाताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांची पथके तरुणांच्या शोधात रवाना करण्यात आली आहेत. हा प्रकार शनिवारी (दि. 16) दुपारी बाराच्या सुमारास घडल्याचा समोर आला.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालय झाले असले तरी शहरातील काही सीसीटीव्ही कॅमे-यांचे नियंत्रण पुणे पोलिसांकडे देखील आहे. पुणे पोलिसांकडून देखील पिंपरी-चिंचवड शहरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली जाते. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास हिंजवडीमधील एका सीसीटीव्ही कॅमे-यात दोन तरुण स्प्लेंडर दुचाकीवरून पाकिस्तानचा झेंडा घेऊन जातानाचे दृश्य कैद झाले.

  • पुणे पोलिसांनी पिंपरी-चिंचवड नियंत्रण कक्षाला याबाबत तात्काळ माहिती दिली. पिंपरी-चिंचवड नियंत्रण कक्षाला याबाबात माहिती मिळताच त्यांनी हिंजवडी, वाकड आणि सांगवी परिसरात अलर्ट जारी केला. संबंधित सर्व पोलीस ठाण्यातील पोलिसांनी तरुणांचा शोध सुरु केला आहे. सर्व परिसराची पाहणी केल्यानंतर देखील पोलिसांच्या हाती शनिवारी रात्री पर्यंत काही लागले नाही. रविवारी पुन्हा तरुणांच्या शोधात पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट उसळली आहे. तब्बल 350 किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी (दि. 14) पुलवामा जिल्ह्यात भीषण आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 40 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यानंतर लगेच दोन दिवसात हा प्रकार घडल्याने पोलिसांची धावपळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.