Hinjawadi : भरधाव वेगात आलेल्या कारची समोरच्या कारला धडक; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कात्रज-देहूरोड बाह्यवळण रस्त्यावरून जाणा-या इनोव्हा कारला स्विफ्ट कारने धडक दिली. त्यानंतर, स्विफ्ट कार रस्त्याच्या बाजूच्या फलकाच्या खांबाला धडकली. यामध्ये स्विफ्ट कारमधील एकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. १८) सकाळी पावणेसहाच्या सुमारास पाषाण तलावाजवळ बावधन येथे घडली.

राकेश रामकुमार सिंग (वय ३८, रा. बोडकेवाडी, माण, ता. मुळशी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

वजीर शहाबुद्दीन उस्मानी (वय ३२, रा. नेरुळ वेस्ट, नवी मुंबई) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार करन कैलास काथवटे (वय २७, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी पावणेसहाच्या सुमारास फिर्यादी वजीर त्यांच्या इनोव्हा कार (एम एच ०४ / सी एम ८४३६) मधून मुंबईच्या दिशेने जात होते. ते बावधन येथील पाषाण तलावाजवळ आले असता त्यांच्या मागून स्विफ्ट कार (एम एच १४ / एच यु ०५३१) भरधाव वेगात आली.

स्विफ्ट कार आरोपी कार चालवत होता. स्विफ्ट कारने इनोव्हा कारला धडक दिली आणि स्विफ्ट कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खांबाला धडकली. यामध्ये स्विफ्ट कारमध्ये ड्रायवरच्या बाजूला बसलेल्या राकेश याचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.