Hinjawadi : ‘त्या’ तरुणाच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी सांगितले, ‘तो डीजे समोर नाचत नव्हता’

एमपीसी न्यूज – हिंजवडी येथे एका मेडिकल दुकानात गोळ्या घेण्यासाठी गेलेला तरुण चक्कर येऊन पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान तरुणाचा मृत्यू डीजेच्या समोर नाचताना त्रास होऊन झाला असल्याचे सांगण्यात आले. यावर हिंजवडी (Hinjawadi) पोलिसांनी ‘तो तरुण डीजेसमोर नाचत नसून तो ज्या मेडिकल दुकानात गोळ्या घेण्यासाठी गेला, तिथे जवळपास कुठेही डीजे वाजत नसल्याचे सांगितले.
हिंजवडी येथे गणेश विसर्जन मिरवणूक सुरु असताना एका तरुणाच्या मृत्यूची घटना घडली. डीजेच्या आवाजाने तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती क्षणार्धात पसरली. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी (Hinjawadi) पोलिसांनी याबाबत माहिती घेतली असता तो तरुण डीजे समोर नाचत नसल्याचे समोर आले.
Hinjawadi : हिंजवडीत मिरवणुकीच्या दरम्यान तरुण कार्यकर्त्याचा मृत्यू
योगेश अभिमन्यू साखरे (वय 23, रा. मारुती मंदिरासमोर हिंजवडी गावठाण) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश याला मागील सहा महिन्यांपूर्वी बीपीचा त्रास होत असल्याने तो हिंजवडी येथील स्थानिक डॉक्टरांकडे निदानासाठी गेला. त्या ठिकाणी त्यास डॉक्टरांनी सांगितले की, तुला हृदयाचा त्रास आहे. तू गौतम जुगल या डॉक्टरांच्या सिनर्जी हॉस्पिटल कोकणी चौक येथे दाखवून घे आणि उपचार कर.
बुधवारी योगेश हिंजवडी (Hinjawadi) चौकात असताना त्याच्या छातीत दुखू लागले. म्हणून तो समर्थ मेडिकल हिंजवडी चौक येथे गोळ्या घेण्यासाठी गेला. योगेश हा कुठल्याही डीजे समोर नाचत नव्हता, असे प्रत्यक्षदर्शी सांगत असल्याचे डॉ. मुगळीकर म्हणाले. तसेच तो ज्या मेडिकल समोर उभा होता त्या ठिकाणी जवळपास कुठलाही डीजे वाजत नव्हता. मेडिकल जवळ असताना त्याने तेथे आलेले त्याच्या मित्रांना सांगितले की, त्याला चक्कर येत आहे आणि तो लगेच चक्कर येऊन जमिनीवर पडला.
मित्राने तेथेच जवळ असलेले रणजीत हॉस्पिटल येथे त्याला तात्काळ नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला रुबी हॉस्पिटल हिंजवडी येथे तात्काळ घेऊन जाण्याचा सल्ला दिला. योगेश याला रुबी हॉस्पिटल मध्ये नेले असता तेथील डॉक्टरांनी योगेश याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. योगेश याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी औंध हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.