Hinjawadi : उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना अचानक पेटलेल्या कारमध्ये रुग्ण महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रक्तदाब कमी झाल्याने उपचारासाठी महिलेला कारमधून नेत असताना कारने अचानक पेट घेतला. यामध्ये संबंधित महिलेचा होरपळून मृत्यू झाला. कार चालवत असलेल्या भावाने तत्परता दाखवत कारमधील दोघांना सुखरूप बाहेर काढले. मात्र आगीचा जास्त भडका झाल्याने रुग्ण महिलेला वाचविता आले नसल्याने महिलेचा कारमध्ये होरपळून मृत्यू झाला. यामध्ये भावाला देखील भाजले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना आज (सोमवारी) मध्यरात्री एकच्या सुमारास वाकड येथील जकात नाक्याजवळ हॉटेल सयाजीसमोर घडली.

संगीता मनीष हिवाळे ( वय 44, रा. नखाते वस्ती, सौंदर्य कॉलनी, काळेवाडी) असे होरपळून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. जॉन डॅनियल बोर्डे (वय 40) असे जखमी भावाचे नाव आहे. तर सायमन मनीष हिवाळे (वय 15) आणि माया डॅनियल बोर्डे (वय 65) या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री संगीता यांचा रक्तदाब कमी झाला. त्यामुळे मनीष यांनी त्यांना तात्काळ आदित्य बिर्ला रुग्णालयात कार मधून (एम एच 14 / ए एम 3709) घेऊन जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत मनीष यांच्या आई आणि भाचा देखील सोबत होते. वाकड मधील जकात नाक्यासमोर येताच त्यांच्या कारने अचानक पेट घेतला. मनीष यांनी त्यांच्या आई आणि भाच्याला गाडीबाहेर काढले. त्यानंतर मनीष यांनी संगीता यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. यामध्ये मनीष यांच्या उजव्या हाताला आणि डाव्या पायाच्या नडगीला भाजले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अग्निशमन विभागाला याबाबत माहिती मिळताच, संत तुकाराम नगर अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र घटनेत संगीता यांचा होरपळून मृत्यू झाला. कार मधील हिटिंग केबल व कनेक्शन मध्ये बिखाड झाल्यामुळे कारला आग लागली, असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.