Hinjawadi : आलिशान कार चोरणा-या सराईत चोरट्यास गोव्यातून अटक

एमपीसी न्यूज – गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात केवळ आलिशान कार चोरणा-या एका सराईत चोरट्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून हिंजवडीमधून चोरून नेलेली फॉर्च्युनर कार हस्तगत करण्यात आली आहे.

वसिम कासीम सय्यद (वय 32, रा. गुगल, हाऊसिंग सोसायटी, मडगाव, गोवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच ते सहा या कालावधीत हिंजवडी येथून एकाने फॉर्च्युनर कार चोरून नेल्याचा गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करत आरोपीचा माग काढत हिंजवडी पोलिसांचे तपास पथक थेट गोव्यात पोहोचले. गोव्यातील रहिवासी असलेल्या गोव्यासह, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून आलिशान कार चोरी करणा-या वसिम याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली.

विकास दारासिंग परदेशी यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी विकास बावधन येथील कोठारी टोयोटा सर्व्हिस सेंटर येथे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. 21 नोव्हेंबर रोजी त्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये सर्व्हिसिंगसाठी आलेली फॉर्च्युनर कार सर्व्हिसिंग करून तयार झाली. त्यानंतर ग्राहकाच्या घरी सोडण्यासाठी डिलिव्हरी बॉय विकासने कार सर्व्हिस सेंटरच्या बाहेर काढली. सर्व्हिस सेंटर ते मधुबन हॉटेल हिंजवडी या दरम्यानच्या रस्त्यावर आरोपी वसिम याने विकासला गाठले.

‘ये हमारे कंपनी की गाडी है. मै लेने आया हूँ. आप ड्रॉप करने जा रहे है क्या?’ असे म्हणून सर्व्हिसिंगचे सात हजार रुपये रोख देत वसिम याने विकासचा विश्वास संपादन केला. काही अंतर गेल्यानंतर वसिम याने कार ताब्यात घेतली आणि धूम ठोकली. कार मालकाला कार पोहोचली नाही, त्यामुळे कार मालकाने सर्व्हिसिंग सेंटरकडे चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे तपासाची सूत्रे हलवली.

फॉर्च्युनर चोरटा गोवा राज्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तीन दिवस गोव्यात तळ ठोकून हिंजवडी पोलिसांनी आरोपी वसिम याला फॉर्च्युनर कारसह ताब्यात घेतले. त्याने यापूर्वी गोवा राज्यात तीन, कर्नाटक येथे एक असे एकूण चार आलिशान कार चोरीचे गुन्हे केले आहेत. आलिशान कार विकल्यास त्यातून मोठी रक्कम मिळत असल्याने वसिम या आलिशान कार चोरून विकत असे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत मोहिते, वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख अनिरुद्ध गिजे, एम डी वरुडे, सहाय्यक फौजदार वायबसे, पोलीस कर्मचारी बाळू शिंदे, किरण पवार, नितीन पराळे, आतिक शेख, कुणाल शिंदे, विवेक गायकवाड, सुभाष गुरव, अमर राणे, झनकसिंग गुमलाडू, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, विकी कदम, अली शेख, रितेश कोळी, आकाश पांढरे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.