Hinjawadi : एक महिन्यापूर्वी झालेला विनयभंग ‘गुड टच बॅड टच’च्या शिक्षणामुळे आला उघडकीस; शिक्षकाला अटक

एमपीसी न्यूज – इयत्ता सहावीत शिकणा-या विद्यार्थिनीचा वर्गशिक्षकाने विनयभंग केला. हा धक्कादायक प्रकार हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. घटनेनंतर एक महिन्याने शाळेमध्ये घेतलेल्या ‘गुड टच बॅड टच’ या उपक्रमामुळे हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी त्याच शाळेतील एका महिला शिक्षिकेने फिर्याद दिली. त्यानुसार 42 वर्षीय शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. शिक्षकाने 12 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आरोपी शिक्षक नोकरीस होता. मागील एक महिन्यापूर्वी पीडित विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणीसोबत वर्गात बाकावर बसलेली होती. आरोपीने सोबतच्या मुलीला बाकावरून उठवले आणि पीडित विद्यार्थिनीचा विनयभंग केला. हा प्रकार विद्यार्थिनीच्या लक्षातच आला नाही.

काही दिवसांनी शाळेत विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ‘गुड टच बॅड टच’ हा उपक्रम घेण्यात आला. यामध्ये मुलींना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल सांगण्यात आले. त्यानंतर विनयभंग झालेल्या मुलीच्या बाबतीत झालेला संपूर्ण प्रकार तिला आठवला आणि तिने तो शिक्षिका आणि घरच्यांना सांगितला. त्याच शाळेतील महिला शिक्षिकेच्या मदतीने हिंजवडी पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या शिक्षकाने यापूर्वी देखील असा प्रकार केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे त्याची या शाळेत बदली करण्यात आली होती. याबाबत हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.