Hinjawadi : कंपनीच्या पार्किंगमधून भरदिवसा मोपेड पळविली; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – हिंजवडी येथील एका खासगी कंपनीच्या पार्किंगमधून भरदिवसा मोपेड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आज, मंगळवारी (दि. 21) हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शितल राजेश उज्जैनकर (वय 28, रा. बाणेर. मूळ रा. अकोला) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाणेर येथील एका खासगी कंपनीत एच आर स्पेशालिस्ट म्हणून नोकरी करतात. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्या त्यांच्या एम एच 30 / डब्ल्यू 7817 या मोपेडवरून आल्या. त्यांनी ऑफिसच्या पार्किंगमध्ये लॉक करून पार्क केली. दिवसभर त्या ऑफिसच्या कामात होत्या.

दरम्यान, त्या दुपारी ऑफिसच्या कामानिमित्त कॅबने बालेवाडी येथे गेल्या. रात्री काम संपवून त्या सात वाजता घरी गेल्या. मात्र, त्यांची दुचाकी ऑफिसच्या पार्किंगमध्ये होती. त्यामुळे रात्री साडेआठच्या सुमारास उज्जैनकर त्यांची दुचाकी आणण्यासाठी ऑफिसमध्ये गेल्या.

त्यांनी पार्क केलेल्या ठिकाणी त्यांची दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी सर्वत्र चौकशी केली. मात्र, दुचाकी आढळून आली नाही. भरदिवसा ऑफिसच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने त्यांची 30 हजार रुपये किमतीची मोपेड चोरून नेल्याची त्यांनी आज, मंगळवारी (दि. 21) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.