Hinjawadi News: दोन कारवायांमध्ये चार दुचाकी जप्त; हिंजवडी पोलिसांची कारवाई

चार जणांना अटक करण्यात आली असून या कारवाईमुळे हिंजवडी पोलीस ठाण्यातील दोन, सांगवी, वारजे माळवाडी, खडकी पोलीस ठाण्यातील प्रत्येक एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत.

एमपीसी न्यूज – दोन वेगवेगळ्या कारवाया करत हिंजवडी पोलिसांनी चार दुचाकी आणि एक मोबाइल फोन जप्त केला आहे. चार जणांना अटक करण्यात आली असून या कारवाईमुळे हिंजवडी पोलीस ठाण्यातील दोन, सांगवी, वारजे माळवाडी, खडकी पोलीस ठाण्यातील प्रत्येक एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत.

पहिल्या कारवाईमध्ये पोलीस शिपाई पालवे यांना माहिती मिळाली की, वाहन चोरीच्या एका गुन्ह्यातील आरोपी शिवाजी चौकात येणार आहेत. त्यानुसार, पोलिसांनी शिवाजी चौकात सापळा रचून अजय आनंद भोसले (वय 20, रा. हुलावळे वस्ती, हिंजवडी. मूळ रा. तुगाव, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) आणि उल्हास विठ्ठल मोरे (वय 23, रा. फुगेवाडी. मूळ रा. जुळे सोलापूर) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता दोघांनी एमक्युअर फार्मा कंपनीच्या गेट समोरून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

याबाबत युवराज बबन शिंगाडे (वय 33, रा. आंबेगाव पठार) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शिंगाडे हिंजवडी फेज दोन येथील एमक्यूअर फार्मासिटीकल कंपनीत नोकरी करतात. 7 ऑगस्ट रोजी ते सकाळी कंपनीत आले. त्यांनी दहा वाजता त्यांची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 12 क्यूडी 2582) कंपनीच्या गेटसमोर पार्क केली. सायंकाळी पावणे सात वाजता कामावरून कंपनीच्या बाहेर आले असता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे समोर आले होते. या चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरली होती.

आरोपी अजय आणि उल्हास यांनी पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आणखी एक दुचाकी चोरल्याचे पोलीस तपासात सांगितले. पोलिसांनी 40 हजारांच्या दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत.

दुस-या कारवाईमध्ये पोलिसांनी सौरभ शंकर भांडवलकर (वय 24, रा. गणेशनगर, पिंपळे सौदागर) आणि परमेश्वर उर्फ मनोज शिवाजी सूर्यवंशी (वय 20, रा. ओझरकरवाडी, माण) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 40 हजारांच्या दोन दुचाकी आणि सात हजार रुपयांचा एक मोबाइल फोन जप्त केला आहे.

दोन्ही कारवायांमध्ये हिंजवडी पोलिसांनी हिंजवडी पोलीस ठाण्यातील जबरी चोरीचा एक, वाहनचोरीचा एक, सांगवी, खडकी, वारजेमाळवाडी पोलीस ठाण्यातील वाहनचोरीचे प्रत्येकी एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.