Hinjawadi News: घरगुती सिलेंडरमधून गॅस चोरी; चौघांना अटक

एमपीसी न्यूज – घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्यांमधून लहान टाक्यांमध्ये बेकायदेशीरपणे व धोकादायकरीत्या गॅस काढून त्याची चोरी करणा-या चार जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. तसेच जागा उपलब्ध करून देणा-या जागा मालकाच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 22) दुपारी दीड वाजता बालेवाडी क्रीडा संकुलाजवळ म्हाळुंगे येथे करण्यात आली.

विशाल मोहन खुरद (वय 21, रा. बालेवाडी), रघुवीर वसंत काळे (वय 23, रा. बालेवाडी), अर्जुन दत्तात्रय बिरादार (वय 31, रा. बालेवाडी), संग्राम विश्वनाथ पंढारे (रा. बालेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह जागा मालक जीवन पाडळे (रा. म्हाळुंगे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रवीण दळे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी क्रीडा संकुलाजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये ज्वालाग्राही पदार्थांबाबत पुरेशा सुरक्षेचा बंदोबस्त न करता घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून लहान टाक्यांमध्ये गॅस काढून त्याची चोरी केली. आरोपी जीवन याने यासाठी जागा उपलब्ध करून दिली.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारने छापा मारून कारवाई केली. यात चौघांना अटक करून त्यांच्याकडून सिलेंडर टाक्या, गॅस भरण्याचे साहित्य असा एकूण 53 हजार 570 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.