Hinjawadi News : नेरे कासारसाई पारिसरात बिबट्याचे दर्शन; परिसरात भीतीचे वातावरण

एमपीसी न्यूज – हिंजवडी जवळ असलेल्या नेरे-कासारसाई या मार्गावर शेताच्या बांधावर शनिवारी (दि. 12) रात्री दोन बिबट्याचे दर्शन झाले. मामाच्या गावाहून गोडुंब्रे या गावी परत येत असताना एका महिलेला नेरे-कासारसाई या गावांच्या दरम्यान रस्त्याच्या बाजूला असलेल्या उसाच्या शेताच्या बांधावर दोन बिबटे दिसले. त्यानंतर त्या महिलेने आणि तिच्या भावाने बिबट्याचा व्हिडीओ काढला. नेरे, कासारसाई परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुवर्णा पालवे यांचे मामा आजारी असल्याने त्या गोडुंब्रे गावातून शनिवारी नेरे गावात आल्या होत्या. मामाच्या तब्बेतीची विचारपूस केल्यानंतर त्या रात्री त्यांच्या गावी निघाल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत मुलगा आदर्श पालवे आणि भाऊ आकाश आगळे असे दोघेजण होते.

रात्री आठ वाजताच्या सुमारास त्या नेरे-कासारसाई या गावांच्या दरम्यान असलेल्या रस्त्याने जात असताना एका उसाच्या शेताच्या बांधावर बिबट्या दिसला. पालवे आणि त्यांच्या भावाने गाडी थांबवली आणि बिबट्याचा व्हिडीओ बनवला. काही वेळ बिबट्या बांधावर थांबला आणि नंतर उसाच्या शेतात निघून गेला. पालवे यांच्या मते तिथे दोन बिबटे होते. मात्र पालवे यांनी काढलेल्या व्हिडीओ मध्ये एकच बिबट्या दिसत असून वन विभागाने दुसऱ्या बिबट्याची पुष्टी दिली नाही.

मागील पाच ते सहा दिवसांपासून बिबट्या नेरे परिसरात आहे. त्याने नेरे येथील ग्रामस्थ हनुमंत पायगुडे यांच्या जवळपास आठ कोंबड्या फस्त केल्या असल्याचे म्हटले जात आहे. रात्रीचा प्रवास करणाऱ्या लोकांच्या अंगावर तसेच पाळीव कुत्र्यांवर देखील हा बिबट्या धावून येत असल्याने त्याची परिसरात दहशत पसरली आहे.

नेरे गावचे सरपंच दत्तात्रय जाधव म्हणाले, नागरिकांनी नेरे परिसरात बिबट्या आढळल्याची माहिती वन विभागाला दिली आहे. त्यानुसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचा पायाचे ठसे नेले आहेत.

असे असले तरी बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावायला हवा. त्याला जेरबंद करून सुरक्षित ठिकाणी सोडावे. एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असेल, असा सवाल देखील सरपंच जाधव यांनी उपस्थित केला आहे.

बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यासाठी वन विभागाच्या नागपूर मुख्यालयातून परवानगी घ्यावी लागते, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सरपंच जाधव यांना सांगितले. बिबट्याचे पुन्हा दर्शन घडल्याने वनविभागाची टीम नेरे येथे गावकऱ्यांमध्ये जनजागृती करणार असल्याचेही सरपंच जाधव म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.