Hinjawadi News: ड्युटीवर झोपल्याचे फोटो काढून वरिष्ठांना पाठवल्याच्या कारणावरून एकावर खुनी हल्ला

मेट्रोच्या साईटवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा कामगार झोपी गेला. त्याचे फोटो काढून स्टोअर असिस्टंटने वरिष्ठांना पाठवले. त्या रागातून झोपणा-या सुरक्षा रक्षकाने फोटो काढणा-या स्टोअर असिस्टंटवर खुनी हल्ला केला.

एमपीसी न्यूज – मेट्रोच्या साईटवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा कामगार झोपी गेला. त्याचे फोटो काढून स्टोअर असिस्टंटने वरिष्ठांना पाठवले. त्या रागातून झोपणा-या सुरक्षा रक्षकाने फोटो काढणा-या स्टोअर असिस्टंटवर खुनी हल्ला केला. ही घटना 23 ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजता मारुंजी शिवार वस्ती येथे घडली.

चंदन अरविंदकुमार मिश्रा (वय 24, रा. भूमकर चौक, वाकड. मूळ रा. बिहार) असे जखमी स्टोअर असिस्टंटचे नाव आहे. विनोद माधवराव खंडाईत (वय 45, रा. बुचडे चाळ, मारुंजी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 17 वर्षीय सुरक्षा रक्षक मुलाला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पुणे मेट्रोच्या रिच दोन येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. तो ड्युटीवर असताना झोपी गेला. त्याचे झोपल्याचे फोटो स्टोअर असिस्टंट चंदन मिश्रा यांनी काढले आणि ते फोटो स्टोअर व्यवस्थापकांना दाखवले.

या कारणावरून आरोपीने चंदन शिवीगाळ करून लोखंडी पाईपने डोक्यात मारून खुनी हल्ला केला. त्यानंतर सिमेंटचा ब्लॉक चंदन यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. फिर्यादी विनोद हे चंदन यांना वाचविण्यासाठी गेले असता आरोपीने विनोद यांना मारण्याची धमकी दिली. याबाबत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.