Hinjawadi News : विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनांच्या मालकांचा पोलिसांकडून शोध सुरु

तीन दिवसात 175 मालकांचा शोध लागला

एमपीसी न्यूज – विविध गुन्ह्यात आणि कारवाईमध्ये जप्त केलेली शेकडो वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात वर्षानुवर्षे धूळ खात पडलेली असतात. काही वाहने जागेवर कुजतात. त्यामुळे पोलीस ठाण्याचा परिसरात विद्रुप दिसतो. अशा धूळ खात पडलेल्या बेवारस वाहनांच्या मूळ मालकांचा शोध लावण्याचे काम हिंजवडी पोलीस एका संस्थेच्या माध्यमातून करीत आहेत. मागील तीन दिवसात 175 मालकांचा शोध लागला आहे.

वेगवेगळ्या गुन्ह्यात वापरलेली वाहने पोलीस जप्त करतात. तसेच अपघातग्रस्त वाहने, अन्य कारवाई केलेली वाहने पोलीस ठाण्यात आणून लावली जातात. त्यांच्यावर कारवाई केली जाते. त्यानंतर ती वाहने अनेक दिवस पोलीस ठाण्याच्या आवारातच पडलेली आढळून येतात.

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील प्रत्येक पोलीस ठाण्यात शेकडो वाहने धूळ खात पडलेली आहेत. अनेक वर्षांपासून त्या वाहनांच्या शोधात पोलीस ठाण्यात कुणीही फिरकले नाही. त्यामुळे वाहनांचे काही पार्ट कुजले आहेत. हिंजवडी पोलीस ठाण्यात 400 पेक्षा अधिक वाहने पडलेली आहेत.

या वाहन मालकांचा शोध घेण्यासाठी हिंजवडी पोलिसांनी परंदवडी येथील गंगामाता वाहन शोध संस्थेच्या साहाय्याने एक मोहीम हाती घेतली आहे. तीन दिवसात 175 वाहनांच्या मूळ मालकांचा शोध लावण्यात पोलीस आणि संस्थेच्या संयुक्त पथकाला यश आले आहे.

वाहन मालकाचे नाव, वाहनाचा नोंदणी क्रमांक, वाहनाचा प्रकार, चासी क्रमांक, इंजिन क्रमांक, मालकाचा पत्ता या माहितीची यादी हिंजवडी पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहे. वाहन मालकांनी आपापली वाहने ओळख पटवून घेणून जाण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्यात पडलेल्या वाहनांपैकी मालकांचा शोध लागलेली वाहने महाराष्ट्र राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, मुंबई, नागपूर, रायगड, सातारा, लातूर, रत्नागिरी, कोल्हापूर, नंदुरबार या भागातील आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर हुबळी, भोपाळ, ऑरा बुरुज गुजरात , भुवनेश्वर येथील देखील काही वाहने आहेत.

पोलिसांकडून वाहन मालकांशी संपर्क केला जाणार आहे. त्यानंतर 15 दिवसात वाहन न नेल्यास त्या वाहनांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लिलाव करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.