Hinjawadi News : कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरलेल्या पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांचा गौरव

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शर्थीचे प्रयत्न करून ऑक्सिजन मिळवून देत 25 कोरोनाबाधित रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी देवदूत ठरलेले हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने देवदूत सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण भवन येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खाकी वर्दीतील देवदूत सावंत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन आणि व्हेन्टिलेटरचा प्रचंड तुडवडा निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत हिंजवडी परिसरातील एका खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन संपला. त्यामुळे तिथे ऑक्सिजनवर उपचार घेणाऱ्या २५ रुग्णांचा जीव धोक्यात आला होता. अशा संकटसमयी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत यांनी शर्थीचे प्रयत्न करून मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मदतीने या 25 रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून दिला. सावंत यांच्या तत्परतेमुळे त्या कोरोनाबाधित रुग्णांना जीवदान मिळाले.

सावंत यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने देवदूत सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.