BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : हिंजेवाडी नव्हे ‘हिंजवडी’

कार्यालयीन पत्रव्यवहारामध्ये चुकीचा नामोल्लेख टाळण्याची हिंजवडी ग्रामस्थांची पीएमआरडीएकडे मागणी

एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यालयातून होत असलेल्या पत्रव्यवहारांमध्ये हिंजवडी गावाचा नामोल्लेख हिंजेवाडी असा करीत आहेत. चुकीच्या अपु-या माहितीमुळे या चुका होत आहेत. त्यामुळे या चुका दुरुस्त करण्यासाठी पीएमआरडीए कार्यालयातून होणा-या पत्रव्यवहारांमध्ये हिंजवडी गावाचा नामोल्लेख हिंजेवाडी असा न करता ‘हिंजवडी’ असा करावा. त्याबाबतचे आदेश काढण्याची मागणी हिंजवडी ग्रामस्थांनी पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

हिंजवडी ग्रामस्थांकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आयटी हबमुळे हिंजवडी गावाचा नावलौकिक संपूर्ण जगभर झाला आहे. नोकरीनिमित्त देशाच्या विविध भागातून आयटीयन्स हिंजवडी परिसरात वास्तव्य करीत आहेत. मात्र, चुकीच्या, अपु-या माहितीमुळे आणि कदाचित जाणीवपूर्वक गावाचा नामोल्लेख हिंजवडी ऐवजी हिंजेवाडी असा केला जात आहे. यामुळे नावाचा वाद सर्व स्तरांवर पोहोचला आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने राजपत्र प्रसिद्ध करून ‘हिंजवडी’ हेच नाव योग्य असल्याचे सांगितले आहे.

योग्य नामोल्लेख करण्याचा आदेश काढावा
गावाच्या नावामध्ये परस्पर बदल करणे बेकायदा आहे. याला वेळीच आला घातला पाहिजे. अन्यथा, गावाच्या मूळ नावाचे अस्तित्व धोक्यात येईल. बांधकाम व्यावसायिक त्यांच्या वेगवेगळ्या साईटच्या जाहीरातींमधून आणि काही वृत्तपत्रातून देखील हिंजवडी गावाचा नामोल्लेख हिंजेवाडी असा केला जात होता. इंग्रजी मध्ये लिहिताना Hinjawadi ऐवजी Hinjewadi असे लिहिले जात होते. मात्र, काही दिवसांपूर्वी स्थानिकांनी याबाबत स्पष्टीकरण देत यात बदल करण्यास सांगितले. त्यानंतर या होणा-या चुका कमी झाल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थांच्या भावनांशी छेडछाड न करता पीएमआरडीएकडून होत असलेला चुकीचा नामोल्लेख बंद करून योग्य नामोल्लेख करण्याचा आदेश काढावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3