Hinjawadi : कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील गुंडाला अटक; गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

Notorious gangster Nilesh Ghaiwal gang member arrested; Action of Crime Branch Unit One

पिस्टल आणि दोन काडतुसे जप्त
एमपीसी न्यूज – कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या टोळीतील गुंड आणि पोलीस रेकॉर्डवरील आरोपी असलेल्या एकाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

 

दत्ता उर्फ बबलू मालपोटे (वय 26, रा. कात्रखडक गाव, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई गणेश पंढरीनाथ सावंत यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत होते. त्यावेळी पोलीस शिपाई गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार दत्ता मालपोटे हिंजवडी येथील बापुजी बुवा मंदिराजवळ कोणालातरी भेटण्यासाठी येणार आहे.

त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा लावला. आरोपी तरुण चालत मंदिराच्या समोर येऊन थांबला. पोलीस त्याला पकडण्यासाठी गेले असता पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून शिताफीने पकडले.

आरोपी दत्ता याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा 26 हजारांचा मुद्देमाल सापडला. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी दत्ता हा कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीचा सदस्य आहे. त्याच्या विरुध्द पौड, कोथरूड, दिघी, लोणावळा पोलीस ठाण्यात खून, दरोडा, अपहरण, शस्त्र अधिनियामान्वये एकूण सहा गुन्हे दाखल आहेत.

आरोपी दत्ता याने निलेश गावडे आणि इतर साथीदारांच्या मदतीने 2018 मध्ये गजानन मारणे टोळीचा सदस्य राजू कुंभार याचा पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून केला होता.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळूराम लांडगे, पोलीस कर्मचारी सचिन उगले, गणेश सावंत, प्रवीण पाटील, विजय मोरे, प्रमोद लांडे, नितीन खेसे, मनोजकुमार कमले यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.