Hinjawadi: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले दोन रुग्ण आढळून आल्याने अनेक आयटी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून ऑफिसमध्ये न येता घरातूनच काम करण्याच्या (वर्क फ्रॉम होम) सूचना दिल्या आहेत. 

करोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अनेक आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम म्हणजे ‘वर्क फ्रॉम होम’ करायला सांगितले असून दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. हिंजवडी, वाघोली, तळवडे येथील आयटी पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या आहेत. हजारो कर्मचारी व अधिकारी या कंपन्यांमध्ये काम करतात. करोना हा संसर्गजन्य रोग असल्याने विशेष दक्षता घेण्याची भूमिका आयटी कंपन्यांच्या व्यवस्थापनांनी घेतल्याचे पहायला मिळत आहे.

आयटी कंपन्यांचे बहुतांश काम हे इंटरनेट आणि संगणकावर चालते. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामासाठी ऑफिसमध्येच जाण्याची आवश्यकता नसते. घरी इंटरनेट, संगणक अथवा लॅपटॉप असल्यास आयटी कर्मचाऱ्यांना घरात बसून त्यांचे ऑफिसचे काम विनासायास करता येते. कंपनीत शेकडो, हजारो कर्मचाऱ्यांना एका ठिकाणी कामासाठी यावे लागत असल्याने त्यातून विषाणू संसर्ग होण्याची भीती असल्याने अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कंपनीत आल्याशिवाय काम करणे शक्य नाही, अशा कर्मचाऱ्यांनाच कंपनीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. मात्र कंपनीत प्रवेश देताना त्यांना सर्दी, खोकला अथवा ताप नाही ना, याची खातरजमा करून घेण्याच्या सूचना सुरक्षा विभागाला देण्यात आल्याचे समजते.

हिंजवडी परिसरात वाहतूक कोंडीची समस्या ही दररोजची डोकेदुखी ठरत आहे. ‘वर्क फ्रॉम होम’च्या प्रयोगामुळे हिंजवडीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या घटणार असल्याने काही दिवस वाहतुकीवरील ताण देखील कमी होण्याची शक्यता आहे. या प्रयोगाला कसा प्रतिसाद मिळतो, याबाबतही उत्सुकता दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.