Hinjawadi : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंजवडीत साकारली धान्याची ‘पृथ्वी’

एमपीसी न्यूज – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जगभर विविध कार्यक्रम, उपक्रम घेण्यात येतात. विविध पद्धतीने पर्यावरण वाचविण्याचा आणि त्याला समृद्ध करण्याचा संदेश दिला जातो. त्याच धर्तीवर हिंजवडी येथील युनिवर्सल बार्बेक्यू येथे विविध धान्यांचा वापर करून पाच फुटांचा ‘पृथ्वी’गोल बनविण्यात आला आहे.

जागतिक तापमानवाढ आणि हवामानात होणारे बदल हे सध्या जगासमोर अतिशय गंभीर प्रश्न म्हणून समोर आहेत. त्यासाठी पृथ्वीवर हिरवाईचे आच्छादन असणे आवश्यक आहे. वृक्षतोड झपाट्याने केली जात आहे. त्याप्रमाणात वृक्षारोपण आणि संवर्धन होताना दिसत नाही. त्यामुळे मानव जोपर्यंत पृथ्वीला हिरवाईचा शालू नेसवणार नाही, तोपर्यंत जागतिक तापमानवाढ कमी होणार नाही. त्याबरोबरच अन्य प्रकारचे प्रदूषण कमी करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा संदेश देणारा पृथ्वीगोल हिंजवडी येथील युनिवर्सल बार्बेक्यू येथे साकारला आहे.

  • या पृथ्वीगोलावर हिरवळ कमी असणारा प्रदेश आणि घनदाट हिरवळीचा प्रदेश दाखविण्यात आले आहे. त्यासाठी गहू, तांदूळ, डाळ, मूग अशा प्रकारचे धान्य वापरण्यात आले आहे. तीन दिवस झटून हा पृथ्वीगोल तयार करण्यात आला. जगभरात कोणत्या प्रदेशात वृक्षारोपण करणे गरजेचे आहे, असा प्रदेशही दाखवण्यात आला आहे.

युनिवर्सल बार्बेक्यूचे व्यवस्थापक हेमंत भानुशाली म्हणाले, “समाजात पर्यावरण रक्षणाबद्दल जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बार्बेक्यूमध्ये येणा-या सर्व ग्राहकांना भेट म्हणून एक रोपटे देण्यात येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये झाडांबद्दल आकर्षण वाढेल. सर्वांनी पर्यावरण रक्षणासाठी सजग राहायला हवे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.