Hinjawadi : घरफोडीच्या गुन्ह्यात नऊ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

hinjawadi-police-arrest-a-person-wanted-in-a-house-break-in-case-was-absconding-since-last-nine-years

एमपीसी न्यूज – घरफोडीच्या गुन्ह्यात नऊ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 16) भक्ति शक्ती चौक, निगडी येथे करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तो फरार होता.

अनिल दत्ता कांबळे (वय 28, रा. मिलींदनगर, ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस फरार आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलिसांना आरोपी अनिल कांबळे हा भक्ती शक्ती चौकात येणार असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी परिसरात सापळा रचून कांबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी आरोपीला पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2011 साली एक घरफोडी केल्याचे कबूल केले. या कारवाईमुळे हिंजवडी पोलीस ठाण्यातील नऊ वर्षांपासून प्रलंबित असलेला एक गुन्हा उघडकीस आला आहे.

ही कारवाई युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, सहायक फौजदार वासुदेव मुंडे, आदिनाथ मिसाळ, पोलीस कर्मचारी संजय गवारे, नारायण जाधव, धनाजी शिंदे, तुषार काळे, सुखदेव गावंडे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.