Hinjawadi Crime News : अखेर ‘त्या’ खूनाचा दृश्यम स्टाईलने हिंजवडी पोलिसांकडून उलगडा

एमपीसी न्यूज – बायकोच्या प्रियकराचा खून केला. त्यानंतर मृतदेह दारूच्या भट्टीत रात्रभर जाळला. मृतदेहाची हाडे आणि त्यासोबत एका शेळीचा मृतदेह दोन पोत्यात भरून पोते नदीवर आणि नाल्यात टाकून त्याची विल्हेवाट लावली. पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपीने शेळी मारून शेळीचा मृतदेह नदी पात्रात टाकल्याचे सांगितले. मात्र हिंजवडी पोलिसांनी या खुनाचा उलगडा करून याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

लंकेश सदाशीव रजपुत ऊर्फ लंक्या (रा. बावधान बु. पुणे), गोल्या ऊर्फ अरूण कैलास रजपुत (रा. बावधान बु. पुणे), सचिन तानाजी रजपुत (वय 25, रा. कासारआंबोली भवानी नगर, ता. मुळशी जि. पुणे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. एका अल्पवयीन मुलाला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावधन येथील भरत उर्फ भुषण शंकर चोरगे (वय 27, रा. बावधन बु. पुणे) याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. 21 ऑक्टोबर रोजी त्या तरुणाने त्या महिलेला रात्री दोन मिसकाॅल दिले. त्यावेळी महिलेच्या पतीने मिसकॉल पाहिल्यावर पत्नीला विचारणा करून तिला मारहाण केली. मारहाण केल्याने महिला पळून गेली.

दरम्यान संपर्क न झाल्याने तिचा प्रियकर मयत भुषण चोरगे त्याठिकाणी महिलेस भेटण्यासाठी आला. संबंधीत व्यक्ती आल्याचे कळताच महिलेच्या पतीने व त्याचे दोन साथीदार यांनी मिळून त्याला मारहाण करून त्याला धारधार शस्त्राच्या सहाय्याने छातीवर व पोटात वार करुन त्याचा खून केला. मृतदेह बोलेरो गाडीत घालून बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी उरवडे गावात असलेल्या त्याच्या दारुच्या भट्टीमध्ये त्याला रात्रभर जाळले.

मृतदेह जाळल्यानंतर त्याची राख व इतर अवशेषाची घोटावडे परीसरातील नदीवर व नाल्यात टाकून विल्हेवाट लावली. त्यानंतर त्याचा एक खुनामध्ये सहभागी नसलेला सहकारी सचिन राजपुत यास मयत भुषण चोरगे याची बॉडीची राख व अवशेष पोत्यात भरुन उरवडे येथील एका नाल्यात टाकली आहे असे सांगून मुख्य आरोपी मध्यप्रदेश येथे पळून गेले.

दरम्यान भुषण चोरगे रात्री घरी आला नाही म्हणून त्याची आई शांता शंकर चोरगे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात भुषण हरवल्याची तक्रार दिली. या मिसिंगचा तपास करताना संशयित लंकेश राजपुत याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने काहीएक उपयुक्त माहीती दिली नाही.

दरम्यान, भुषण चोरगे मिसींग झाल्याच्या दुसऱ्या दिवशी भुषण चोरगे यांच्या आईला त्याची एकच चप्पल संशयित लंकेश राजपुत याच्या घरासमोर मिळाली. तसेच भुषण व लंकेश यांची 21 ऑक्टोबर रोजी रात्री वादावादी झाल्याचेही पोलिसांना समजले.

पोलिसांनी आरोपी लंकेश राजपुत, गोल्या ऊर्फ अरूण रजपुत, सचिन रजपुत, व त्याचा इतर एक साथीदार यांनी भुषण चोरगे यांचे अपहरण केल्या बाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासात संशयित आरोपी म्हणून सचिन राजपुत याला अटक करून त्याच्याकडे तपास केला असता त्याने मुख्य आरोपी लंकेश राजपुत व अरुण राजपुत अशा तिघांनी मिळून मध्यप्रदेश येथे पळून जाण्याच्या अगोदर भुषण चोरगे यांचा खुन करुन बॉडी जाळल्याचे व राख टाकून देऊन विल्हेवाट लावल्याचे सांगितले.

राख टाकलेले ठिकाण आरोपीने दाखवले असताना उरवडे गावाच्या नाल्यात दोन पोती मिळाली. त्यामध्ये शेळीची बॉडी कापून टाकली असल्याचे दिसले व पोलीसांना चकवण्यासाठी सदरची व्युहरचना केल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यानच्या काळात फरारी मुख्य आरोपी लंकेश व त्याचा साथीदार अरुण यांचा शोध घेत असता ते दोघे मध्यप्रदेश येथे लपून बसले आहेत अशी बातमी मिळाल्याने एक टिम तयार करून मध्यप्रदेश येथे जाऊन आरोपींना अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.