BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : शिवप्रेमीने साकारली अभेद्य प्रतापगडाची प्रतिकृती

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – आजवर आपण प्रति पंढरपूर, प्रति बालाजी, प्रति शिर्डी अशा धार्मिक स्थळांचाच उल्लेख ऐकला आणि पहिला आहे. ऐतिहासिक स्थळांविषयी फारसं कोणी मनावर घेताना दिसत नाही. जर घेतलंच तर गणेशोत्सवात काही गणेश मंडळे ऐतिहासिक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्या दहा दिवसांच्या पलीकडे तो इतिहास दाखवला जावा. त्याची जिवंत प्रतिकृती साकारावी, असा विचारही आजवर कोणी केला नाही. पण साता-याच्या एका शिवप्रेमीने ही गोष्ट सत्यात उतरवली आहे. त्याने चक्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणा-या प्रतापगडाची प्रतिकृती साकारली आहे.

अडीच एकरात साकारलेली ही प्रतिकृती 50 फूट उंच आहे. या किल्ल्यावर 150 ते 200 माणसे एका वेळी फिरू शकतात. जिवंत मावळे, घोडे, तोफा, शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि त्यासमोर डौलात फडकणारा भगवा यामुळे गडावर फिरताना प्रतापगडाचा इतिहास डोळ्यासमोर तराळल्याशिवाय राहत नाही. 1656 साली जावळीचा परिसर स्वराज्यात आला. त्यानंतर 1658 साली मोरोपंतांनी या किल्ल्याचे काम पूर्ण केले. त्यानंतर अफजलखान वध हा तर या किल्ल्याची जणू ओळखच बनली आहे.

या प्रतापगडाच्या प्रतिकृतीचे निर्माते धनंजय बर्वे हे साता-यात एका फॅब्रिकेशनच्या वर्कशॉपमध्ये कारागीर म्हणून काम करतात. आयुष्याची अनेक वर्षे फॅब्रिकेशनच्या वर्कशॉपमध्ये काम केल्यानंतर सुखी संसाराची स्वप्ने घेऊन काही रक्कम जमा केली. पण जमा केलेल्या या पैशांचा योग्य वापर कसा करावा, ही त्यांना सुचत नव्हते. घरची मंडळी, नातेवाईक आणि मित्रपरिवाराने एक छोटंसं टुमदार घर बांधण्याचा सल्ला दिला. यातून नवीन व्यवसाय सुरु करण्याचा सल्ला दिला. पण धनंजय यांना त्यांनी कष्टाने मिळवलेले पैसे एका चांगल्या कामासाठी खर्च करायचे होते. असाच एके दिवशी त्यांच्या मनात विचार आला कि, आजवर धार्मिक स्थळांच्या प्रतिकृती बनविल्या गेल्या आहेत. पण आपल्याला लाभलेल्या एवढ्या समृद्ध इतिहासाची प्रतिकृती कोणीच बनवली नाही.

महाराष्ट्र राज्याला गड-किल्ल्यांचे वैभव मोठ्या प्रमाणात लाभले आहे. प्रत्येकाला गड-किल्ल्यांना भेटी द्यायला शक्य होत नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारा एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती आपण साकारायला हवी. पण कोणता किल्ला ? यामध्ये काही दिवस गेले. त्यानंतर प्रतापगड हा निश्चित झाला. पण एवढ्या मोठ्या किल्ल्याची प्रतिकृती साकारायची म्हणजे जागाही तशी मोठीच लागणार. त्यामुळे जागेचा शोध सुरु झाला. साता-यातून सुरु झालेला जागेचा शोध पुण्यातील हिंजवडी येथे येऊन संपला. हिंजवडी मधील दिलीप भरणे, दत्तात्रय भरणे आणि सुनील भरणे या तिघा भावंडांनी त्यांची अडीच एकर जागा धनंजय यांना प्रतापगडाच्या प्रतिकृतीसाठी दिली.

जागा मिळाली आणि काही रक्कम हाताशी होती. पुन्हा किल्ल्याच्या तांत्रिक आणि स्थापत्याविषयी अनेक अडचणी आल्या. धनंजय यांच्याकडे अभियांत्रिकी किंवा स्थापत्य शास्त्राची कोणतीही पदवी नाही. तरीही स्वराज्यातील एका अभेद्य किल्ल्याची प्रतिकृती साकारायची आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचे दर्शन पुणेकरांसह अवघ्या महाराष्ट्राला घडवायचे, एवढाच ध्यास घेऊन काम सुरु झाले. हिंजवडीच्या चौकातून रोजंदारीवर माणसे आणून त्यांच्याकडून काम सुरु झाले. गणेशोत्सवात सुरु झालेले काम 27 डिसेंबर 2018 रोजी पूर्ण झाले. पारंगत नसलेल्या माणसांकडून काम करून घेतले जात असल्याने अनेक वेळा केलेले काम जमीन दोस्त करावे लागले. 16 ते 17 लाख रुपये खर्च करून उभारलेली ही प्रतिकृती सर्वांना पाहण्यासाठी आता खुली करण्यात आली आहे. किल्ला पाहण्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात आले आहे.

महाबळेश्वरच्या डोंगररांगांमध्ये वसलेला प्रतापगड ज्यांना पाहणे झाले नाही. त्यांनी आवर्जून या किल्ल्याला भेट द्यायला हवी. एका ध्येयवेड्या तरुणाची जिद्द आणि मेहनत, त्याला मिळालेली साथ यातून सुद्धा शिवकाळातील अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतील. हिंजवडी फेज एक येथे माण रोडवर ही प्रतिकृती पुढील दोन ते तीन महिने डौलाने उभी आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
.