Hinjawadi : हिंजवडी-माण रस्त्यावर मजुरांची घोषणाबाजी; मूळगावी जाऊ द्या, म्हणत मजुरांचा टाहो

एमपीसी न्यूज – हिंजवडी-माण रस्त्यावर मंगळवारी (दि. 28) बांधकाम मजुरांनी घोषणा दिल्या. आम्हाला आमच्या मूळगावी जाऊ द्या, काम नसले तरी आम्हाला पगार द्या, अशा मागण्यांसाठी मजुरांनी टाहो फोडला. हिंजवडी पोलीस आणि परिसरातील लोकप्रतिनिधींनी मजुरांशी चर्चा करून समन्वय साधला.

मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शेकडो मजूर अचानक रस्त्यावर येऊन घोषणाबाजी करत माण- हिंजवडी मुख्य रस्त्याने हिंजवडीच्या दिशेने निघाले. यावेळी त्यांनी अन्य बांधकाम साईटवरील मजुरांना देखील या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. या प्रकरणाची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस आणि परिसरातील लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली.

आम्हाला आमच्या मूळगावी कुटूंबाकडे जाऊ द्या. ठेकेदाराने खर्ची दिली तरी पगारातून कमी करणार असल्याची भीती आहे. त्यामुळे ते पैसे कमी करू नये. दरम्यानच्या काळात उधार घेतलेल्या किराणा मालाची रक्कम प्रकल्प व्यस्थापनाने द्यावी. काम सुरू नसले तरी कामगारांचे पूर्ण वेतन त्यांना मिळावे. ते वेतन ठेकेदारांकडे न देता सरळ कामगारांकडे रोख स्वरूपात द्यावे. शासनाने मजुरांसाठी रेल्वे सुरू करावी, अशा मागण्या या कामगारांनी केल्या.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वेळेतच जमावाला शांत केले. यावेळी हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, माणचे सरपंच राजेंद्र भोसले, सुनील भरणे आणि पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी प्रकल्प व्यवस्थापकांना बोलावून कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सूचना दिल्या.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी म्हणाले, ”लाॅकडाऊन उठवणे किंवा रेल्वे चालू करणे आमच्या हातात नाही. परंतु शासन लवकरच याबाबत काहीतरी निर्णय घेईल. तोपर्यंत कामगार उपाशी राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल. मात्र नियम मोडून रस्त्यावर जमाव केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.