Hinjawadi : राज्य परिवहन महामंडळाची एशियाड बस जळून खाक; सर्व प्रवासी सुखरूप

एमपीसी न्यूज – मुंबईहून पुण्याला येत असलेल्या बसने अचानक पेट घेतला. यामध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी वेळेत खाली उतरले असल्याने मोठे संकट टळले आहे. ही घटना आज, मंगळवारी (दि. 4) दुपारी पाचच्या सुमारास बावधन येथे सीएनजी पेट्रोल पंपाजवळ घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी मुंबईहुन स्वारगेटकडे राज्य परिवहन महामंडळाची बस 35 प्रवाशांना घेऊन येत होती. बावधन येथे सीएनजी पंपाजवळ बस आली असता बसमधील प्रवाशांना बसच्या टायरमधून धूर येत असल्याचे दिसले. प्रवाशांनी तात्काळ चालकाला बस थांबवण्यास सांगितले. बस रस्त्याच्या बाजूला घेऊन सर्व प्रवासी खाली उतरले. त्यावेळी, बसचे एक टायर पूर्णपणे जळाले होते. टायरवरील फायबरचे वेस्टन देखील जळाले होते.

सर्व प्रवासी खाली उतरल्यानंतर अचानक संपूर्ण बसने पेट घेतला. पुणे अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळाली असता कोथरुड आणि पाषाण अग्निशमन उपविभागाचे दोन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचे बसच्या चालकाने सांगितले आहे. बसला लागलेली आग एवढी भीषण होती, की त्यामध्ये बसमधील ऍल्युमिनिअम देखील वितळले आहे. सर्व प्रवासी वेळेत बसमधून खाली उतरल्यामुळे मोठा धोका टळला आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like